जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या स्पर्धेला सुरूवात; स्पर्धेत पाच जिल्ह्यातील खेळाडूंचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 09:08 PM2023-09-23T21:08:39+5:302023-09-23T21:09:00+5:30
श्लोक वारके, खुश बांगडीया अंतिम फेरीत
भूषण श्रीखंडे, जळगाव: जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन आयोजित नाशिक विभागीय टेबल टेनिस स्पर्धेला शनिवारी प्रारंभ झाला. जळगावच्या जिल्हा क्रीडा संघात सुरू झालेल्या या स्पर्धेत १३० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. विविध वयोगटात शनिवारी झालेल्या सामने झाले. यात ११ वर्ष गटात जळगावचा श्लोक वारके व धुळ्याचा खुश बांगडीया यांनी अंतिम फेरी गाठली आहे.
नाशिक विभागीय टेनिस स्पर्धेचे उद्घाटन सकाळी दहा वाजता जिल्हा क्रीडा संघात झाले. आमदार सुरेश भोळे व जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी टेबल टेनिस खेळून स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी जिल्हा असोसिएशनचे उपाध्यक्ष चंद्रशेखर त्रिपाठी, मनोज अडवाणी, कार्याध्यक्ष प्रकाश चौबे, कोषाध्यक्ष संजय शहा, सचिव विवेक आळवणी, सहसचिव सुनील महाजन, राजू खेडकर, कन्हैयालाल संतानी, हेमंत कोठारी, राहुल पवार, हर्षद दोषी, संजय जोशी, शैलेश राणे आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत यजमान जळगावसह नाशिक, अहमदनगर, धुळे व नंदुरबार या पाच जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी ॲड. विक्रम केसकर, शैलेश जाधव,आयोजक सचिव स्वानंद साने, अमित चौधरी, पुष्कर टाटीया आदींचे सहकार्य लाभत आहे.
साखळी पद्धतीने झाले सामने
विभागीय स्पर्धेत ११,१३,१५,१७ वर्ष वयोगटातील मुले व मुली तसेच पुरुष व महिला गटाचे सामने खेळविले जात आहेत. १३ वर्ष वयोगटात भूमीज सावदेकर, श्रीराम केसकर, आरूष जाधव (जळगाव), १५ वर्षं वयोगट - अर्णव पाठक (धुळे), प्रेषित पाटील (जळगाव), मुलींमध्ये- श्रध्दा साने, आर्या बेहेडे (जळगाव), १७ वर्ष वयोगट- दक्ष जाधव, युग अग्रवाल, राजवीर भतवाल (धुळे), मुलींमध्ये- स्वरदा वालेकर (नाशिक), मृण्मयी साळवे, ध्रुवी बांगडीया, मैथिली थत्ते (धुळे), १९ वर्षं वयोगट- युग अग्रवाल (धुळे), ओजस येवले, जस वेद (जळगाव) या खेळाडूंनी उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.