‘नही’कडून महामार्गाच्या दुरुस्तीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 08:03 PM2020-02-10T20:03:38+5:302020-02-10T20:03:49+5:30
‘लोकमत’चा पाठपुरावा : आता समांतर रस्त्यासाठी लढा
जळगाव : केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या आदेशानुसार शहरातील महामार्गावरील खड्डे व साईडपट्टी दुरुस्तीचे काम सोमवारी हाती घेण्यात आले. सकाळी ११ वाजता आहुजा नगर व द्वारका नगराजवळ यंत्रसामुग्री व मनुष्यबळ दाखल झाले. दिवसभरात या भागातील काम पूर्ण करण्यात आले. दरम्यान, या रस्त्याबाबत ‘लोकमत’ ने सोमवारी वृत्त प्रकाशित केले होते.
राष्ट्रीय महामार्गावर आहुजा नगराजवळ शनिवारी सायंकाळी दुचाकीवरील गायत्री समाधान पाटील (२७, रा़ वाणी गल्ली, पिंप्राळा) ही महिला ठार झाली होती. खराब रस्ते, साईडपट्टीमुळे अपघात होत असल्याने या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना व्ट्ीट करुन जळगाव शहरातील व जिल्ह्यातील हायवेवर अपघातात किड्या मुंग्यासारखे रोज निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. ‘नही’ चे अधिकारी दाद देत नाहीत. कृपया आपण तात्काळ रस्ते दुरुस्तीसाठी कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती केली होती. रस्ता दुरुस्ती झाली नाही तर आंदोलन करण्याचाही इशारा देसले यांनी दिला होता.गडकरी यांनी या व्ट्ीटची दखल घेऊन तत्काळ ‘नही’चे प्रकल्प संचालक सी.एम.सिन्हा यांच्याशी संपर्क साधून तातडीने रस्ते दुरुस्तीचे आदेश दिले होते. त्यानंतर सिन्हा यांनी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे कंत्राटदार तथा अॅग्रो इन्फोचे संचालक आर.के.मित्तल यांना तातडीने काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
देसले यांच्या समक्ष कामाला सुरुवात
आश्वासनाप्रमाणे मित्तल यांनी शनिवारी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली, तेथे योगेश देसले यांनाही बोलावण्यात आले होते. खड्डे दुरुस्ती, साईडपट्ट्यांचा भराव व डांबरीकरण असे काम करण्यात आले. दोन दिवसात या भागातील काम पूर्ण केले जाणार आहे. दरम्यान, खोटे नगर ते गिरणा पूल या दरम्यान महामार्गाला लागून समांतर रस्ते व्हायला हवे, त्यासाठी आपला पाठपुरावा सुरु असून हा प्रश्न मार्गी लागला नाही तर रहिवाशांना घेऊन आंदोलन करु असा इशारा देसले यांनी दिला आहे.