सर्व विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:21 AM2021-04-30T04:21:03+5:302021-04-30T04:21:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य शासनाच्या वतीने १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्याचे योजिले आहे. त्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्य शासनाच्या वतीने १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्याचे योजिले आहे. त्यामुळे अधिका-अधिक लोकांना लसीचा लाभ घेता यावा म्हणून सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, जेणेकरून सोशल डिस्टन्सिंग पाळायला अडथळा होणार नाही, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
१८ ते ४५ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाच्या मोहिमेला लवकरच सुरुवात होणार आहे. ही योजना उत्तमरीत्या राबविण्याकरिता काही मागण्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये लसीकरणाच्या मोहिमेत सर्व प्रकारच्या उत्तीर्ण डॉक्टरांना सहभागी करून घेण्यात यावे, तसेच लसीकरण केंद्रांवर वैद्यकीय मदतीसाठी प्यारामेडिकल शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभागी करण्यात यावे, वैद्यकीय मदतीव्यतिरिक्त अन्य कामांसाठी एनएसएस, एनसीसी, अभाविप तसेच अन्य सामाजिक संस्था, संघटनांचा समावेश करून घेण्यात यावा, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा किंवा ग्रामपंचायत कार्यालयांत हे लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्न केला पाहिजे. घरकाम करणाऱ्या किंवा अनेक घरांत जाणाऱ्या कामगारांना प्राथमिकतेने लस देण्यात यावी आदी मागण्यांचा यात समावेश आहे.