जळगावात वसुंधरा महोत्सवाला थाटात प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 12:39 PM2017-12-08T12:39:55+5:302017-12-08T12:43:37+5:30
निसर्ग भ्रमण, पोस्टर व फेस पेंटिंग स्पर्धा आणि लघुपट शुक्रवारी होणार सादरीकरण
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. ८ : समर्पण संस्था संचलित पर्यावरण शाळेतर्फे कांताई सभागृहात आयोजित तीन दिवसीय वसुंधरा महोत्सवाला गुरुवारी सायंकाळी थाटात प्रारंभ झाला़ या वेळी पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºयांना वसुंधरा पुरस्काराने गौरविण्यात आले़
महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन हे होते़ व्यासपीठावर महापौर ललित कोल्हे, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, रोटरी क्लब ईस्टचे अध्यक्ष डॉ. गोविंद मंत्री, वन्यजीव अभ्यासक अभय उजागरे, समर्पण संस्थेचे सचिव संजय भावसार यांची उपस्थिती होती. या वेळी उपस्थितांचे रोप देऊन स्वागत करण्यात आली. व्यासपीठार वडाच्या रोपट्याला पाणी देऊन महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
महापौर ललित कोल्हे, पुरस्कारार्थी डॉ़ राधेश्याम चौधरी, डॉ़ गोविंद मंत्री यांनीही मनोगत व्यक्त केले़ सूत्रसंचालन अर्चना उजागरे व मेघना भंडारी यांनी केले. उद्घाटनानंतर टेंपल आॅफ टायगर्स हा लघुपटही दाखविला. जुन्या परंपरा, संस्कृती नष्ट होताना या आधुनिक काळात वाघांची एक नवीन पिढी या मध्य भारतातील बांधवगढ या परिसरात राज्य करत असून यावर चित्रपटाची अंत्यत चित्तथरारक कहाणीने उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते.
सामान्यांच्या क र्तृत्वाला पुरस्कार
आपण जन्म घेऊन पृथ्वीवर आल्यावर या विश्वासाठी काही करून जावे या विचारानेच जैन उद्योग समूहाचे संस्थापक स्व.भवरलाल जैन हे जगले. त्यानुसारच आमची पुढची वाटचाल सुरू असल्याचे जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यावेळी म्हणाले. लिमजीवाला हे निसर्गप्रेमी होते़ त्यामुळे त्यांच्या नावाने वसुंधरा महोत्सवात पुरस्कार देण्याची कल्पना सुचली़ ही त्यांना खरी श्रद्धांजली असून महोत्सवात दरवर्षी व्यक्ती, संस्थांना पुरस्कार दिले जाणार असल्याचे ते म्हणाले़ सामान्य माणसांच्या कर्तृत्वाला हा पुरस्कार असल्याचेही अशोक जैन यांनी या वेळी सांगितले़
पर्यावरणाबद्दल जनजागृती करून जीवन समृध्द करू या
या वेळी भरत अमळकर म्हणाले की वसुंधरा महोत्सव ही एक चळवळ असून इथे एकत्र येऊन पर्यावरणाच्या विविध विषयांवर चर्चा होते़ ही चळवळ म्हणजे विश्वाची काळजी घेणारी रचना उत्पन्न करण्याची प्रक्रिया आहे. आजच्या काळात वन्यजीवांना मारू नका व मारा असे दोन गट म्हणणारे समोर आहे़ वाघ, बिबटे, वृक्ष हे संकट होता कामा नये, यासाठी जनजागृती करू या आणि जीवन समृद्ध करूया, पर्यावरण प्रेम हे मानवतेच्या मुळावर आणि मानवता ही पर्यावरणाच्या मुळावर उठायला नको, अशी अपेक्षाही अमळकर यांनी व्यक्त केली.
बिबट्याबाबत शासनास संहिता देणार
वसुंधरा महोत्सवाचे संयोजक राजेंद्र नन्नवरे यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात सातवा बळी बिबट्याने घेतला आहे. बिबट्यांवर कोणतेही शासनाचे धोरण नाही यावर सविस्तर चर्चा करणार असून त्याबाबत कागदोपत्री संहिता शासनाला देणार आहोत़ या महोत्सवाने सर्व पर्यावरणवादी एकत्र आले. हा फक्त इव्हेंट नाही तर चळवळ झाली असल्याचेही सांगितले.