भादली भुयारी रेल्वे मार्गाचे काम सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:19 AM2021-09-26T04:19:27+5:302021-09-26T04:19:27+5:30
नशिराबाद : भादली रेल्वे गेट नंबर १५३ याठिकाणी भुयारी रेल्वेमार्गाचे काम मंजूर झाले असल्यामुळे रेल्वे गेट गेल्या तीन वर्षांपासून ...
नशिराबाद : भादली रेल्वे गेट नंबर १५३ याठिकाणी भुयारी रेल्वेमार्गाचे काम मंजूर झाले असल्यामुळे रेल्वे गेट गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेकदा याबाबत ओरड झाली, निवेदने देऊन झाली. मात्र, रेल्वे प्रशासन फक्त तारीख पे तारीख देत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. आता दिलेल्या आश्वासनाप्रमाणे भुयारी मार्गाचे काम तत्काळ सुरू व्हावे. त्यामुळे शेतकऱ्यांची कसरत थांबेल, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसने रेल्वे प्रबंधक, भुसावळ यांना दिले आहे. या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन, चंदू पाटील, सय्यद बरकतअली आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. ९ जुलै २०२१ रोजी शेतकऱ्यांनी निवेदन दिले होते. त्यानुसार २८, २९, ३० जुलै रोजी गांधीगिरी आंदोलनाचा इशारा दिला होता. पण भुसावळ विभागाचे मध्य रेल्वेचे बांधकाम अभियंता पंकज धाबारे यांनी सप्टेंबरअखेर काम सुरू करू, अशी माहिती प्रसिद्ध केली होती. त्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी आंदोलन रद्द केले. पावसाळा संपत आला आहे, त्यामुळे आतातरी हे अंडरपास ब्रीजचे काम लवकर सुरू करावे, अशी विनंती निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी केली आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत काम सुरू न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.