घरी जायला निघाले, वाटेतच काळाची झडप! जळगावमध्ये कार व दुचाकी अपघातात एक जण ठार
By विजय.सैतवाल | Published: July 13, 2024 11:45 PM2024-07-13T23:45:55+5:302024-07-13T23:46:12+5:30
लग्नासाठी आलेल्या कारसोबत अपघात, खिशातील कागदपत्रांवरुन त्यांची ओळख पटली
विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: कार व दुचाकीचा अपघात होऊन नीलेश केशव बारी (४४, मूळ रा. शिरसोली, ह. मु. शास्त्रीनगर) हे ठार झाले. हा अपघात शनिवारी (१३ जुलै) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रामदास कॉलनीत झाला.
मूळचे शिरसोली येथील व शेती करणारे नीलेश बारी हे सध्या कुटुंबियांसह गिरणा टाकी परिसरातील शास्त्री नगरात राहत होते. शनिवारी रात्री ते सागर पार्ककडून दुचाकीने घराकडे जात असताना रामदास कॉलनीतील हनुमान मंदिराच्या गल्लीत अचानक समोर एक कार आली व दुचाकीस्वार नीलेश बारी हे कारवर धडकले. ते कारच्या दरवाजावरील काचवर आदळल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्त्राव झाला. ते बराच वेळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्याठिकाणाहून जाणाऱ्या एका तरुणाने जखमी बारी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील यांनी मयत घोषीत केले.
कागदपत्रावरून पटली ओळख
नीलेश बारी यांच्या खिशातील कागदपत्रांवरुन त्यांची ओळख पटली. काही तरुणांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत संपर्क साधून त्यांना अपघाताची माहिती दिली. त्यानुसार बारी यांचे वडील व पत्नी रुग्णालयात पोहचले. यावेळी त्यांचा मृतदेह बघताच त्यांनी आक्रोश केला.
लग्नासाठी आलेल्या कारसोबत अपघात
अपघातानंतर दुचाकी धडकलेला कारचालक रुग्णालयात दाखल झाला. त्या कारमधील नागरिक अहमदनगर येथील असून ते जळगावात पुतण्याच्या लग्नासाठी आले होते. त्याठिकाणी जात असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.