विमानसेवेचा १७ सप्टेंबरला प्रारंभ
By admin | Published: May 25, 2017 12:48 AM2017-05-25T00:48:52+5:302017-05-25T00:48:52+5:30
१८ सिटर डेक्कन चार्टर्डद्वारे सेवा : विमानतळावर विविध सुविधांबाबत प्राधिकरणाच्या सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नव्याने जाहीर करण्यात आलेल्या विमान मार्गात जळगाव विमानतळाचा समावेश करण्यात आला असल्याने तब्बल सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शहरवासीयांना २५०० रुपयात विमान प्रवास करता येणार आहे. या सेवेचा येत्या १७ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार असून त्या संदर्भातील पत्र येथील विमानतळ प्रशासनास प्राप्त झाले आहे.
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या उड्डाण योजनेत नवे ४५ विमान मार्ग जाहीर करण्यात आले आहेत. यात महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला असून जळगाव येथेही विमानसेवा प्रस्तावित करण्यात आली आहे. जळगाव ते मुंबईचे अंतर या सेवेमुळे आणखी कमी होणार असून उद्योजक, व्यापारी, अधिकारी तसेच नागरिकांसाठी ही सेवा मोठी उपलब्धी ठरणार आहे.
सात वर्षांपासून प्रतीक्षा
२०१० मध्ये जळगाव विमानतळ पूर्ण होऊन तत्कालीन राष्टÑपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन झाले होते. तेव्हापासून विमानसेवेबाबत प्रतीक्षा होती. यासाठी विविध विमान कंपन्यांशी स्थानिक उद्योजकांनी संपर्क साधून सेवा मिळावी असे प्रयत्न केले होते मात्र त्यात यश येऊ शकले नव्हते. तसेच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील १० विमानतळांचा विस्तार व तेथून विमान सेवा सुरू करण्याचे जाहीर केले होते. त्यात जळगाव विमानतळाचाही समावेश होता.
कंपन्यांची नकार घंटा
पुरेसे प्रवासी मिळणे शक्य होणार नाही या शक्यतेने विविध विमानसेवा देणाºया कंपन्यांकडून विमानतळ विकास प्राधिकरणास नकारच मिळत होता. स्थानिक उद्योजकांनी यासाठी पुढाकार घेऊन जेट, किंगफिशर सारख्या कंपन्यांशी तीन वर्षांपूर्वी संपर्क साधला. जेटतर्फे यासाठी सर्वेक्षणही झाले होते. मात्र नंतर या कंपनीनेही नकार घंटा वाजविली होती.
सुसज्ज विमानतळ
जळगावपासून पाच कि.मी. अंतरावरील कुसुंबा गावाजवळ ३०३ हेक्टर जमिनीवर विमानतळाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम २०१० मध्ये पूर्ण झाले आहे.
विमानतळासाठी प्राप्त ६१ कोटींच्या निधीतून विविध कामे झाली आहेत. यात प्रवासी टर्मिनल पूर्ण झाले आहे. या टर्मिनलची विद्युत उपकरणे ही सौर ऊर्जेवर चालणार आहेत. प्रवासी टर्मिनलमध्ये अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी दोन कक्ष, प्रवाशांसाठी मोठे प्रतीक्षालय, सुरक्षा तपासणी केंद्र आहे. विमानतळासाठी स्वतंत्र वीज फिडर बसविण्यात आला आहे. यासाठी स्वतंत्र भूमिगत वीज वाहिनी टाकण्यात आली आहे.
अहवाल दिल्लीला दिला
संयुक्त समितीने जळगाव विमानतळावर पाहणी केल्यानंतर त्याबाबतचा अहवाल स्थानीय संपर्क अभियान समिती, नवी दिल्ली येथे पाठविला होता. त्यावरून जळगावला विमान सेवा देण्याचा निर्णय झाला आहे.
विमातळ प्रशासनास सूचना
विमानतळ विकास प्राधिकरणाकडून स्थानिक अधिकाºयांना नुकतेच एक पत्र प्राप्त झाले असून १७ सप्टेंबरपासून विमान सेवा सुरू करण्याबाबत कळविण्यात आले आहे. जळगाव येथून पहिल्या टप्प्यात मुंबई येथे ही सेवा देण्यात येणार आहे.
दिवसाला एक विमान
पहिल्या टप्प्यात जळगाव येथे सकाळी एक १८ सिटर डेक्कन चार्टर्ड विमान रोज येणार आहे. दुपारी ३ वाजेच्या दरम्यान हे विमान मुंबईकडे रवाना होईल. या सेवेसाठी योग्य ती सुरक्षा व्यवस्था व अन्य अनुषंगिक बाबींची पूर्तता केली जावी असे कळविण्यात आले आहे. त्यानुसार स्थानिक अधिकाºयांकडून विविध कामांना गती देण्यात आली आहे.
१७०० मीटर लांब धावपट्टी
सध्या असलेली १७०० मीटर लांब व ४५ मीटर रुंदीची धावपट्टी येथे तयार असून सेवा सुरू होऊन प्रतिसाद मिळू लागल्यावर भविष्यात धावपट्टी विस्तारित करण्याचाही प्रस्ताव होता. हे काम झाल्यावर जळगावला बोर्इंग विमानदेखील उतरू शकेल असे नियोजन होते. विमान उतरल्यानंतर ते अॅप्रनवर येईल. तिथून प्रवाशांना टर्मिनलपर्यंत आणण्यासाठी चारचाकी वाहने ठेवण्यात येतील त्या दृष्टीनेही कामे झालेली आहे.