राज्यात लोकसभेच्या ९ जागा साधू-संत लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 11:30 AM2019-02-06T11:30:46+5:302019-02-06T11:31:44+5:30

निर्धार सभेत घोषणा

In the state 9 saints will contest Saints and saints in the state | राज्यात लोकसभेच्या ९ जागा साधू-संत लढणार

राज्यात लोकसभेच्या ९ जागा साधू-संत लढणार

Next
ठळक मुद्देराजकारण शुध्दीकरणाची भक्तगणांना दिली शपथ


जळगाव : देशभरात राजकीय पक्षांनी अनागोंदी माजविली असून लोकशाहीची क्रृर चेष्टा सुरु आहे. हिंदुत्ववादी संघटना देशभरात शंभर टक्के शुध्द उमेदवार लोकसभेत देणार असून त्याची घोषणा प्रयागराज येथे होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात साधु संत ९ जागा लढविणार असल्याची घोषणा मंगळवारी सायंकाळी ६ वाजता शहरातील सागर पार्क येथे झालेल्या प्रवचन व निर्धार सभेत विविध संत व महाराजांनी केली़
या सभेआधी जय बाबाजी भक्त परिवाराच्या अनुयायांतर्फे दुपारी ३ वाजता मोटारसायकल रॅली काढण्यात आली़ ही रॅली आकाशवाणी चौक, नविन बसस्थानक, कोर्ट चौक, टॉवर चौक, नेरी नाका, पांडे चौक, शिरसोली नाका परिसर येथून सागर पार्क येथे समाप्त झाली. सभेत सुरुवातीला सप्त खंजिरीवादक सत्यपाल महाराज आकोटकर यांनी प्रवचन केले़ सत्यपाल महाराज म्हणाले की, नेता अधिकारप्रिय आणि कर्तव्यदक्ष असावा. नोट घेऊन वोट करू नका. अंधश्रध्देला बळी न पडता समाजसुधारकांचे विचार अंगीकारा. देशात कुपोषण, महिला अत्याचार याचे प्रमाण प्रचंड असून पैसा गरीबांच्या कल्याणासाठी वापरावा असेही ते म्हणाले. त्यानंतर पालखी पूजन झाले. यावेळी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज, स्वामी देवगोपाल शास्त्री महाराज, स्वामी महाहंस महाराज, महंत रजनीशपुरी महाराज, आचार्य जनार्दन महाराज, हभप मंगेश महाराज, हभप दादा महाराज जोशी आदी उपस्थित होते.
राजकारणात चांगली माणसे यावी
राष्ट्रभक्ती आज काळाची गरज आहे. १०० टक्के मतदान होणे गरजेचे आहे. शुद्धीकरण अभियान कोणत्या पक्षाच्या विरोधात नाही. राजकारणात चांगले माणसे आली पाहिजे, सभेत विष्णू महाराज यांनी सांगितले़ त्यानंतर स्वामी औसानंद महाराज म्हणाले की, भारत हा आस्था प्रधान देश आहे. राजकारण शुद्धीकरण हे गरजेचे झाले आहे. पैसा स्वार्थाने देशाला धोका आहे. ब्रह्मचारी देवगोपाल महाराज यांनी सांगितले, आताची परिस्थिती ही सत्तेतून पैसे आणि पैशापासून राजकारण सुरू आहे. भविष्यात सत्याचा विजय होणार आहे असेही ते म्हणाले.
यावेळी सत्यपाल महाराज यांचे सप्त खंजिरीवादन आकर्षक ठरले. कार्यक्रमासाठी पाचोरा व चाळीसगावसह इतर ठिकाणचे भक्त परिवारातील सदस्य उपस्थित होते.
प्रलोभनांना बळी पडू नका
देशात क्रांती आणण्यासाठी आणि परिवर्तनाची लाट येवून शुध्द राजकारण निर्मिती करण्यासाठी साधूसंत राजकारणात येणे महत्वाचे झाले आहे. कुप्रवृत्ती दूर करण्यासाठी जनतेने आता निष्पक्ष असणाऱ्या संत महाराजांना सत्तेत आणावे, असे शांतीगिरी महाराज यांनी सांगितले़ त्यानंतर त्यांनी राजकारण शुध्दीकरणाची उपस्थिताना शपथ दिली़ त्यात त्यांनी कुठल्याही प्रलोभनांना चांगल्या माणसांना मतदान करण्याचे आवाहन केले़ सभा यशस्वितेसाठी जय बाबाजी भक्त परिवाराच्या अनुयायांनी परिश्रम घेतले. यावेळी कार्यक्रमात जिल्हभरातून नागरिकांची उपस्थिती होती़ तसेच विविध माहितीपर स्टॉल्स् लावण्यात आलेले होते़

Web Title: In the state 9 saints will contest Saints and saints in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.