चोपडा पॅटर्नची राज्य आणि केंद्राकडून दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:13 AM2021-06-03T04:13:28+5:302021-06-03T04:13:28+5:30
चोपडा : कोरोनाचे संकट हे कुणा एका व्यक्तीवर नाही, हे ब्रीद लक्षात घेऊन चोपडा येथे लोकसहभागातून आरोग्य सुविधा हा ...
चोपडा : कोरोनाचे संकट हे कुणा एका व्यक्तीवर नाही, हे ब्रीद लक्षात घेऊन चोपडा येथे लोकसहभागातून आरोग्य सुविधा हा उपक्रम राबविण्यात आला. या अनोख्या उपक्रमाची राज्य आणि केंद्र सरकारनेही दखल घेतली. या लोकसहभागात जवळपास ३३ लाखांची रक्कम जमा झाली.
कोरोना आपत्तीत काय करायचे ? असा प्रश्न सर्वांपुढे होता. तालुक्यातील सर्व डॉक्टर व काही नागरिक यांची दोन वेळा बैठक झाली आणि इथेच चोपडा पॅटर्नचा जन्म झाला. या पॅटर्नचे वैशिष्ट्य म्हणजे याला कोणतेही नाव नाही व यात कोणतेही राजकारण न करता साऱ्यांनी मदत केली.
सुरुवातीला कोविड सेंटरची गरज होती. त्यासाठी गादी, सॅनिटायझर,पाण्याचे जार, अगदी स्वच्छतेच्या वस्तू, प्रत्येक रुग्णाला बेडशिट यासारख्या असंख्य वस्तू लोकसहभागातून गोळा करीत केंद्र सुरू झाले. लोकसहभागातूनच दोन ड्यूरा आणि २५ जंबो सिलिंडर तसेच ९० रुग्णांसाठी ऑक्सिजन पाईपलाईन केली गेली. दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व एक एक्स रे मशीनसह पीपीई किट,पंखे, थंड पाण्याची व्यवस्था व इतर साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. त्याकाळात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत नव्हते तर तेही उसनवारी करून रुग्णांना दिले जायचे. त्यांना उपलब्ध झाले की ते आणून द्यायचे ते पुढच्याला कामाला येत होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्या काळात गणपूर येथे प्रथम ग्रामीण भागातील लोकसहभागातून विलगीकरण कक्ष सुरू केले व दुसऱ्या लाटेत वेळोदे येथे दुसरे विलगीकरण कक्ष तेथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून सुरू केले. सरकारने प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ३० बेडचे विलगीकरण कक्षासाठी आता जीआर काढला आहे. हे विशेष.
यासाठी अधीक्षक डॉ. मनोज पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासूरकर,डॉ. गुरुप्रसाद वाघ, डॉ.पंकज पाटील, डॉ. चंद्रकांत बारेला, डॉ. सुरेश पाटील, डॉ. प्रशांत पाटील, उद्योजक राहुल सोनवणे, मयूर शिंदे,रमाकांत सोनवणे, दीपक पाटील, स्वप्नील महाजन, सुनील महाजन, नितीन निकम, प्रा. विशाल पाटील, ॲड. कुलदीप पाटील, मुन्ना सोमाणी, संजीव बाविस्कर, साबीर शेख, आरिफ शेख, सऊद बागवान, जगदीश बोरसे, प्रा. प्रदीप पाटील यांच्यासह असंख्य सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी कृती समितीचे कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले.