धरणगावला स्टेट बँकेचे सेवाकेंद्र फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 06:49 PM2019-03-17T18:49:32+5:302019-03-17T18:49:52+5:30
महिलेची मंगलपोत लांबविण्याचा प्रयत्न फसला
धरणगाव : शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून शनिवारी रात्री येथील बालाजी काँम्प्युटरचे स्टेट बँक सेवाकेंद्र्र फोडून तेथील पाच हजार रुपयांची रोकड व इतर साहित्य चोरट्यांंनी लांबविले. या सोबतच पतीसोबत रात्री फिरायला निघालेल्या महिलेच्या गळ्यातून तीन तोळ्याची मंगलपोत लांबविण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला.
नगरपालिकेला लागूनच असलेल्या व्यापारी संकुलातील गाळा क्र.१ मध्ये असलेल्या एसबीआय सेवा केंद्र व सायबर कॅफेचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून ३ सी.सी.टी.व्ही कॅमेरे, १ डीव्हीआर मशिन, १ हार्ड डिस्क, १ मॉनिटर सह पाच हजाराची रोकड लंपास केल्याची फिर्याद स्वप्नील भाटिया व शार्दूल भाटिया यांनी दिली आहे.
दुसऱ्या एका घटनेत जैन गल्लीतील रहिवासी व पी. आर.हायस्कूलमधील शिक्षिका वंदना डहाळे व त्यांचे पती राजेश डहाळे रात्री साडेदहाच्या सुमारास फिरून घरी परत येत होते. परिहार चौकाच्या अहिल्यादेवी होळकर चौकात मोटारसायकलवर दोन जण भरधाव वेगात आले व चालत्या गाडीवरून वंदना डहाळे यांच्या गळ्यातील मंगलपोत ओढूली. त्या वेळी डहाळे यांनी गळ्यातील पोत घट्ट पकडून ठेवली व आरडाओरड केली. सोबत असलेले पती राजेश डहाळे यांचा हा प्रकार लक्षात येईपर्यंत चोरटे भरधाव निघून गेले. घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे आहे. त्यावरून चोरट्यांची हिम्मत दिसून येते.
दर गुरुवारी आठवडे बाजारात सात ते आठ मोबाईल चोरीस जाण्याच्या घटना घडत आहे. मात्र या हरविलेल्या मोबाईलचा तपास लागत नाही. प्रत्येक बाजाराच्या दिवशी महिला चोरांची टोळी मोबाईल चोरी करीत असल्याची चर्चा आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या घटनांबाबत पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.