वकील उमेदवारासाठी प्रदेशाध्यक्षांची वकिली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 02:04 PM2019-03-22T14:04:23+5:302019-03-22T14:05:33+5:30
के.सी. पाडवी यांना काँग्रेसची उमेदवारी : पक्षांतर्गत नाराजी दूर करण्याची कसरत
नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदार संघातून अखेर काँग्रेसने आमदार अॅड.के.सी. पाडवी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यासाठी धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे मत घेवून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे मध्यस्थी केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान काँग्रेसच्या एका नाराज गटाच्या मनधरणीसाठी मात्र पक्षनेत्यांना मोठा प्रयत्न करावा लागणार आहे.
३७ वर्षात प्रथमच बदलला उमेदवार
नंदुरबार लोकसभा मतदार संघात गेल्या ३७ वर्षात (साडेतीन दशकात) प्रथमच यंदा काँग्रेसचा उमेदवार बदलण्याची पक्षावर वेळ आली. ज्येष्ठ नेते व माजी खासदार माणिकराव गावीत हे सलग नऊ वेळा या मतदार संघातून विजयी झाले आहेत. निवडून येणारा उमेदवार व प्रचंड जनसंपर्क हे त्यांचे गुण पक्षासाठी फायद्याचे ठरल्याने आतापर्यंत पक्षाला उमेदवार बदलण्याची गरज भासली नाही. गेल्यावेळी मात्र ते प्रथमच पराभूत झाले. शिवाय सध्या वयोमानाने ते थकल्याने नवीन उमेदवाराचा या वेळी शोध सुरू झाला होता.
अन् संभ्रम मिटला...
नवीन उमेदवारासाठी दोन महिन्यापूर्वीच महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमिटीने आमदार अॅड.के.सी. पाडवी व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा माणिकराव गावीत यांचे पूत्र भरत गावीत यांच्या नावाची शिफारस केली होती. सुरूवातीला के.सी. पाडवी यांचेच नाव पक्षाने पुढे केले होते. परंतु निवडणूक जाहीर झाल्यानंतर भरत गावीत यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केल्याने तेही स्पर्धेत आले होते. अशा स्थितीत पक्षातर्फे कोणाला उमेदवारी मिळेल याबाबत उत्सुकता लागून होती. अखेर मंगळवारी रात्री पक्षाने अधिकृतपणे नंदुरबार लोकसभा मतदार संघातून काँग्रेसतर्फे अॅड.के.सी. पाडवी यांचे नाव जाहीर केल्याने संभ्रम मिटला आहे.
विद्यार्थी चळवळीतून राजकारणात
आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या चळवळीतून त्यांचे नेतृत्त्व उदयास आले. सलग सहा वेळा आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही काँग्रेस पक्षात त्यांना दुसऱ्या फळीतच स्थान होते. आता लोकसभा निवडणुकीत त्यांनी उमेदवारी मिळावी यासाठी चार महिन्यांपासून प्रयत्न सुरू केले होते. त्यासाठी मतदार संघातही संपर्क वाढविला होता. विशेषत: ज्येष्ठ नेते आमदार अमरिशभाई पटेल, आमदार सुरूपसिंग नाईक, काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, माजीमंत्री अॅड.पद्माकर वळवी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला व पक्षश्रेष्ठींकडे त्यांची शिफारस केली. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी देखील त्यांना हिरवा कंदील दिला होता. उमेदवारांच्या मुलाखतीच्या वेळी त्यांचे प्रमुख स्पर्धक म्हणून माजीमंत्री अॅड.पद्माकर वळवी यांचे नाव पुढे आले होते. परंतु अॅड.वळवी यांनी देखील मुलाखतीच्या वेळी के.सी. पाडवी यांना समर्थन दिले. त्यामुळे पाडवी यांचा मार्ग तेव्हाच सुकर झाला होता.
गावित आक्रमक झाल्याने झाला होता पेच
परंतु शेवटच्या टप्प्यात भरत गावीत हे उमेदवारीसाठी आक्रमक झाल्याने पेच निर्माण झाला होता. कारण भरत गावीत व त्यांचे पिता माणिकराव गावीत तसेच नवापूरचे ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक यांचे अर्थातच दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठींकडे वजन असल्याने उमेदवारीबाबत स्पर्धा वाढली होती.
अशा स्थितीत जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केल्याने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अॅड.के.सी. पाडवी यांचे नाव पुढे केले आहे. पाडवी यांना उमेदवारी मिळाल्याने अर्थातच भरत गावीत यांच्या समर्थकांचा हिरमोड झाला आहे. या नाराज कार्यकर्त्यांना जोडण्यासाठी काँग्रेसनेत्यांना प्रयत्न करावा लागणार आहे.
सलग सहा वेळा आमदार
अॅड.के.सी. पाडवी हे धडगाव-अक्राणी मतदार संघातून सलग सहा वेळा आमदार म्हणून विजयी झाले आहेत. १९९०, १९९५, १९९९, २००४, २००९ व २०१४ ची निवडणूक त्यांनी जिंकली आहे. १९९० मध्ये ते जनता दलाकडून, १९९५ मध्ये अपक्ष म्हणून विजयी झाले. तर १९९९ पासून ते काँग्रेसच्या तिकीटावर विजयी झाले.