वृक्षलागवडीचे राज्य शासन करणार ‘आॅडीट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 09:36 PM2018-07-01T21:36:00+5:302018-07-01T21:37:38+5:30

जलसंपदामंत्री गिरीश महाजन

 State government will 'audit' the plantation | वृक्षलागवडीचे राज्य शासन करणार ‘आॅडीट’

वृक्षलागवडीचे राज्य शासन करणार ‘आॅडीट’

Next
ठळक मुद्दे डॉ.सतीश पाटील यांनीच केला शुभारंभ १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेचा जळगाव जिल्हास्तरीय शुभारंभ संबंधीत अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाणार

जळगाव: केवळ वृक्षलागवड करून चालणार नाही तर ती झाडे जगणेही आवश्यक आहे. त्यामुळेच राज्य शासन विविध विभागांमार्फत मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वृक्षलागवडीचे आॅडीटही करणार असून त्याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चाही झाली असल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी एकलग्न ता.धरणगाव येथे वृक्षलागवड मोहीमेच्या शुभारंभप्रसंगी दिली.
राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत यंदा विक्रमी १३ कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत जिल्ह्यात यावर्षी ४२ लाख ४३ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ रविवारी सकाळी ११ वाजता एकलग्न येथे राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
या कार्यक्रमास राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वला पाटील, आमदार चंदुलाल पटेल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार, यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक संजय दहिवले, समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, पंचायत समिती सदस्य मुकुंद नन्नवरे आदी उपस्थित होते.

संबंधीत अधिकाºयांवर जबाबदारी निश्चित केली जाणार
गिरीश महाजन म्हणाले की, नुसतेच खड्डे करायचे, नावाला झाड लावायचे, फोटो छापून आले की दुर्लक्ष. पुन्हा पुढच्या वर्षी त्याच खड्ड्यात झाड लावायचे, हे आता चालणार नाही. याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीतही चर्चा झाली. किती झाडे लावली? त्यातील किती जगली? किती जळाली? याची माहिती घेतली जाणार असून संबंधीत अधिकाºयांवर जबाबदारी निश्चित केली जाईल. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याची पूर्ण काळजी घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले.
दोन-दोन फुटांवर खड्डे करून काम टाळू नका
एकलग्न येथे २९ हेक्टर वनक्षेत्रावर जिल्हास्तरीय वृक्षलागवड मोहीमेच्या शुभारंभ जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नारळ वाढवून आटोपल्यावर सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली. गिरीश महाजन यांच्या हस्ते वडाचे रोप लावण्यात आले. मात्र त्याच्या दोन्ही बाजूंना अवघ्या दोन-दोन फुटांवर खड्डे खणले होते. त्यात लावण्यासाठी आंबा व पिंपळाचे रोप आणून ठेवले होते. महाजन यांच्या हस्ते वडाचे रोप लावल्यावर जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या हस्ते त्या शेजारील खड्यात आंब्याचे रोप लावण्यासाठी देताच महाजन यांनी त्यांना थांबविले. वडाचे झाड किती मोठे होते याचा अंदाज नाही का? त्याच्या शेजारी दोन फुटांवर आंबा आणि पिंपळासारखे वृक्ष लागवड करता का? असा जाब अधिकाºयांना विचारला. जरा तंत्रशुद्धपणे लागवड करा. काम टाळू नका, असे बजावले. त्यानंतर जि.प. अध्यक्षांनी थोड्या अंतरावरील खड्ड्यात वृक्षारोपण केले. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील तसेच उपस्थित अन्य मान्यवरांनी तसेच विद्यार्थ्यांनीही वृक्षारोपण केले.
डॉ.सतीश पाटील यांनीच केला शुभारंभ
वृक्षारोपणाचा कार्यक्रम सकाळी १० वाजता आयोजित केला होता. मात्र कार्यक्रमाचे उद्घाटक जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना यायला उशीर झाला. दरम्यान राष्टÑवादीचे आमदार डॉ.सतीश पाटील हे पारोळ्याहून जळगावकडे निघाले होते. त्यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण असल्याने ते १०वाजून ५० मिनिटांनी कार्यक्रमस्थळी पोहोचले. गाडीतून उतरून मंडपात न येता थेट वृक्षारोपणस्थळी गेले व वृक्षारोपण करून जळगावकडे निघून गेले. त्यामुळे मंत्र्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ ठेवलेला असताना त्यापूर्वीच आमदार डॉ.सतीश पाटील यांनी वृक्षारोपण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करून टाकल्याची चर्चा रंगली. याबाबत डॉ.सतीश पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, मंत्र्यांना वृक्षारोपणाचे महत्व नाही. आम्हाला आहे. मी वेळेवर पोहोचलो. त्यामुळे वृक्षारोपण करून निघून आलो, असे सांगितले.

Web Title:  State government will 'audit' the plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.