एमआयएमच्या राज्यस्तरीय नेत्यांनी मुस्लिम समाजाची दिशाभूल करणे थांबवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:15 AM2021-03-21T04:15:53+5:302021-03-21T04:15:53+5:30
येथील महानगरपालिकेच्या महापौर- उपमहापौर पदाच्या निवडणूकीत एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या उमेदवारांना समर्थन देऊन शिवसेनेला महापौर- उपमहापौर पदाकरीता मतदान केले. ...
येथील महानगरपालिकेच्या महापौर- उपमहापौर पदाच्या निवडणूकीत एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या उमेदवारांना समर्थन देऊन शिवसेनेला महापौर- उपमहापौर पदाकरीता मतदान केले. यामुळे एमआयएम चे महाराष्ट्र कार्याध्यक्ष अ.गफ्फार कादरी यांनी पत्रकार परिषद घेऊन जळगांव एमआयएमच्या जिल्हाध्यक्षांसह एमआयएमच्या तिन्ही नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस देऊन निलंबन करीत असल्याचे घोषित केले. एमआयएमचे म्हणणं आहे की, आपण कोणासही पाठिंबा द्यायचा नाही.
खरे पहिले तर, एमआयएमचे औरंगाबाद येथील खासदार इम्तियाज जलील यांनी दि. ९ मार्च रोजी जाहिर वक्तव्य केले होते की, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही कोणासही पाठिंबा देऊ. तसेच, एमआयएमच्या प्रदेशाध्यक्ष व कार्याध्यक्ष यांना अमरावती मध्ये एमआयएमला शिवसेना व काँग्रेस ने पाठिंबा दिलेला चालतो, परंतु इकडे जळगाव मध्ये शिवसेनेला दिलेला पाठिंबा चालत नाही का ? एमआयएम पक्षाने साधा व्हीप देखील काढला नव्हता.
जळगांवच्या नगरसेवकांचे निलंबन व कारणे दाखवा नोटीस दिली जातेय. म्हणजे खासदार काय बोलतात व एमआयएम चे राज्यस्तरीय नेते काय बोलतात. या नेत्यांनी अगोदर ठरवून घ्यायला पाहिजे की, महाराष्ट्र मध्ये त्यांना काय करायचं आहे. प्रत्येक वेळेस संधिसाधूपणा चालत नाही. एमआयएमचे राज्यस्तरीय नेते खोटेनाटे बोलून संभ्रम निर्माण करून जळगांव च्या भोळ्या मुस्लिम समाजाची दिशाभूल करीत आहे, असेही काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस जमील शेख यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.