अवैध धंद्यांबाबत पोलीस अधीक्षकांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:12 AM2021-07-24T04:12:44+5:302021-07-24T04:12:44+5:30
जळगाव : धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक गावांमध्ये अवैध धंदे सुरू असूनसुद्धा स्थानिक पोलिसांतर्फे या प्रकरणी कुठलीही कारवाई करण्यात ...
जळगाव : धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक गावांमध्ये अवैध धंदे सुरू असूनसुद्धा स्थानिक पोलिसांतर्फे या प्रकरणी कुठलीही कारवाई करण्यात येत नाही. याबाबत वारंवार पोलिसांना निवेदन देऊनही कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे, दलित सामाजिक सेवाभावी संस्थेतर्फे २९ जुलै रोजी पाळधी दूरक्षेत्र येेथे सकाळी ११ वाजता ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत संस्थेचे अध्यक्ष शाम साळुंखे व सचिव अरुण सपकाळे यांनी गुरुवारी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले.
अजिंठा सोसायटीत बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना
जळगाव : अजिंठा चौफुलीवरील अजिंठा हौसिंग सोसायटीत नुकतीच भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी डॉ. उपगुप्त महाथेरो, आमदार सुरेश भोळे, ॲड. राजेश झाल्टे, अजिंठा हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष बाबुराव वाघ, मानद सचिव राजू मोरे आदी समाज बांधव उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बुद्ध विहाराच्या निर्मितीसाठी आर्थिक मदत करणाऱ्या नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
परिवर्तनतर्फे नाट्य शिबिराचे आयोजन
जळगाव : शहरातील परिवर्तन या संस्थेतर्फे २८ व २९ जुलै रोजी नाट्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे व प्रसिद्ध सिनेअभिनेते ओमकार गोवर्धन मार्गदर्शन करणार आहेत. हे शिबीर ला. ना. शाळेच्या गंधे सभागृहात होणार असून, फक्त १५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. परिवर्तन निवड समिती या १५ जणांची निवड करणार आहे. त्यानंतर या विद्यार्थ्यांना वर्षभर विविध नाट्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. दरम्यान, या शिबिरात सामील होण्यासाठी इच्छुकांनी कोरोना लसीचा किमान एक डोस घेतलेला असणे गरजेचे असल्याचे आयोजकांनी कळविले आहे. तसेच १८ ते ४० वर्षे वयोगटात असणाऱ्यांना या शिबिरात सहभाग घेता येणार असून, सहभाग घेणाऱ्या इच्छुकांनी वे मु.जे. महाविद्यालयाजवळील कट्टी-बट्टी येथून प्रवेश अर्ज घेऊन, २५ जुलैपर्यंत जमा करायचे आहेत. या शिबिराचे प्रमुख नारायण बाविस्कर व मंजुषा भिडे असून, कलावंतांनी सहभागी होण्याचे आवाहन परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील यांनी केले आहे.