गटशिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षक संघटनांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:14 AM2021-07-25T04:14:30+5:302021-07-25T04:14:30+5:30
भडगाव तालुक्यातील शिक्षकांचा सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला हप्ता दोन वर्षांपासून जी. पी. एफ. खाती आजतागायत जमा केलेला नाही. ...
भडगाव तालुक्यातील शिक्षकांचा सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला हप्ता दोन वर्षांपासून जी. पी. एफ. खाती आजतागायत जमा केलेला नाही. त्याबाबत अकाउंटन बाविस्कर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन जुलै पेड ऑगस्ट महिन्यात पहिल्या हप्त्याची रक्कम व्याजासह व फरकाचा दुसरा हप्ता सोबत जमा करणार असल्याचे सांगितले. याबाबत लवकरच गटविकास अधिकारी आर. ओ. वाघ यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे सर्वानुमते ठरले. २००१नंतर जिल्हा परिषदेच्या सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना स्थायी प्रमाणपत्र मिळालेली नाहीत व तशी नोंद सेवा पुस्तकात आजतागायत घेण्यात आलेली नाही.
शिक्षकांनी स्थायी प्रमाणपत्राचा प्रस्ताव व त्यासाठी आवश्यक मूळ कागदपत्रे व चारित्र्याचे दाखले यापूर्वीच कार्यालयात जमा केलेले आहेत. त्याबाबत परदेशी यांनी २००५अखेर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांच्या सेवा पुस्तकात स्थायित्वाचा शिक्का मारण्याचा व उर्वरित शिक्षक बंधू-भगिनींचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे तत्काळ पाठविण्यात येतील, असे आश्वासन दिले. निवड व वरिष्ठ वेतनश्रेणी पात्र असलेल्या शिक्षकांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे तत्काळ पाठवून त्रुटींची पूर्तता करण्याचे ठरले. शिक्षकांची मूळ सेवापुस्तके अद्ययावत करण्यासाठी कॅम्प लावण्याचे ठरले. कर सल्लागार योगेश शिंपी यांचे कोरोना काळात निधन झाल्यामुळे त्यांच्याकडील इन्कमटॅक्सच्या प्रलंबित कामाबाबत चर्चा करण्यात येऊन निर्णय घेण्यात आला.
आरोग्य विभागामार्फत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’अंतर्गत टप्पा क्रमांक-३चे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी पुन्हा सोपविण्यात येत असल्याचे सचिन परदेशी सांगितले. त्यावर शाळांचे कामकाज नियमित सुरू झालेले असून स्वाध्याय सोडविणे, सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करणे, शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची बॅंक खाती उघडणे, ऑनलाइन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करणे इत्यादी कामे सुरू असल्याने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ सर्वेक्षणावर बहिष्कार टाकत असल्याचे निवेदन देण्यात आले. दर महिन्याला जेडीसीसी बँकेत पगार उशिरा मिळतो. त्याबाबत आयडीबीआय बँकेकडून पगाराचा चेक लवकर क्लिअर केली जात नसल्यामुळे जेडीसीसी बॅंकेत पगारास उशीर होतो. याबाबत गटविकास अधिकारी आर. ओ. वाघ यांच्यासोबत बैठक घेऊन पगाराशी संबंधित सर्व बॅंक व्यवसथापक यांना या बैठकीत बोलवून चर्चा करण्याचे ठरले.
भेटीप्रसंगी शिक्षक सेना जिल्हा कोषाध्यक्ष टीकाराम पाटील, प्राथमिक शिक्षक संघ सरचिटणीस रावसाहेब पाटील, प्राथमिक शिक्षक समिती जळगाव सरचिटणीस मनोज पाटील, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ तालुकाध्यक्ष अविनाश देवरे, शिक्षण परिषद तालुकाध्यक्ष सुनील पाटील, प्राथमिक शिक्षक सोसायटी पारोळा उपाध्यक्ष प्रवीण पाटील, जिल्हा प्रतिनिधी अखिल जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा प्रतिनिधी योगेश चिंचोले, तालुका सरचिटणीस शिक्षक सेना तालुका सरचिटणीस दिलीप महाजन आदी शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
भडगाव गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांना निवेदन देताना सुनील पाटील, टीकाराम पाटील, प्रवीण पाटील आदी शिक्षक संघटनांचे पदाधिकारी.