जळगाव महापालिकेत उभाणार सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 12:11 PM2019-10-31T12:11:05+5:302019-10-31T12:11:38+5:30
प्रेरणादायी कार्याची महती भावी पिढीला माहिती होण्यासाठी आमदार सुरेश भोळे यांचा मनोदय
जळगाव : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान देणारे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा जळगाव महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये उभारण्यात येणार असून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळताच पुतळा उभा राहणार असून त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुरेश भोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
भारत मातेच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांचे प्रेरणादायी कार्य देशाचे मोठे वैभव असून हे कार्य भावी पिढीलाही माहिती व्हावे व त्यांची प्रेरणा सदैव सर्वांना मिळत राहावी यासाठी त्यांचा पुतळा मनपात उभारण्याचा मनोदय असल्याचे आमदार भोेळे यांचे म्हणणे आहे. ३१ आॅक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असून या दिवसाचे औचित्य साधत आमदार भोळे यांच्या या मनोदयाविषयी माहिती जाणून घेतली असता, त्यांनी पुतळा अनावरणाविषयी माहिती दिली.
पुतळा उभारण्याविषयी प्रस्ताव तयार करण्यात येऊन तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले. या प्रस्तावास मंजुरी मिळताच मनपा इमारतीमधील लिफ्टच्या बाजूला असलेल्या जागेत हा पुतळा उभा राहणार आहे.
पुणे येथे साकारला पुतळा
मनपात बसविण्यात येणारा पुतळा तयारदेखील झाला असून तो पुणे येथे आकाराला आला आहे. सात फूट उंचीचा हा पुतळा असून तो पुण्याहून जळगावात आणण्यात येणार आहे. यासाठी आता प्रतीक्षा आहे ती केवळ प्रस्तावास शासनाची मंजुरी मिळण्याची. साधारण महिना-दीड महिन्यात मंजुरी मिळून हे काम मार्गी लागू शकेल, असा विश्वास आमदार भोळे यांनी व्यक्त केला.
सर्वांना सोबत घेऊन पुतळ््याचे काम
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळा अनावरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाली नाही तरी पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी एकनाथराव खडसे यांच्यासह सर्वांना सोबत घेऊन व या मान्यवरांच्या उपस्थितीत पुतळ््याचे अनावरण करण्यात येईल, असेही आमदार भोळे म्हणाले.
मनपाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यात येणार असून तसा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळताच पुतळा उभा राहणार आहे.
- आमदार सुरेश भोळे.