जळगाव जिल्हा परिषदेच्या ब्रिटिशकालीन इमारतीची स्थिती दयनीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:56 PM2018-08-28T12:56:09+5:302018-08-28T12:58:30+5:30
पडझडमुळे धोकादायक
जळगाव : ब्रिटिशकालीन असलेल्या जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीची अवस्था दयनीय झाली आहे. ही इमारत खूपच जुनी असल्याने कोठे किरकोळ पडझड, तर पावसाळ्यात अनेक ठिकाणी गळती हे प्रकार नेहमीचेच झाले आहे. यामुळे ही इमारत पाडून येथे नव्याने इमारत उभारण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सुमारे शंभरी गाठलेली ही कौलारू इमारत आहे. पूर्वी जिल्हा परिषदेचे संपूर्ण कामकाज याच इमारतीत होत असे. मात्र ही जागा अपूर्ण पडू लागल्याने १९७६ मध्ये बाजूलाच असलेल्या जागेत नवीन इमारत बांधण्यात आली. आता नवीन आणि जुनी अशा दोन इमारतीत जिल्हा परिषदेचे कामकाज सुरू आहे.
एक प्रकारे अंधार कोठडी
जुन्या पद्धतीचे बांधकाम असून या ठिकाणी काही वाढीव बांधकामही नंतर झालेले दिसून येते. बहुतांश खोल्यांमध्ये अंधार असतो. नेहमीच लाईटची गरज भासते. हवाही खेळती नाही. यामुळे कर्मचाऱ्यांना येथे अंधार कोठडीत ठेवल्यासारखेच आहे. जुने बांधकाम असल्याने ते धोकादायकही झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच पडझड
जुन्या इमारतीत असलेल्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयात काही दिवसांपूर्वीच पडझड झाली होती. सुदैवाने कोणास इजा पोहचली नव्हती. मात्र मोठी घटना घडण्याची वाट प्रशासनाने पाहू नये, असे कर्मचाºयांमध्ये बोलले जात आहे.
२०११ मध्ये तयार झाला होता प्रस्ताव
विद्यमान आमदार स्मिता वाघ या गेल्या काळात जि.प. अध्यक्ष असताना त्यांनी जुन्या इमारतीचे बीओटी तत्त्वावर बांधकामाचा प्रस्ताव सरकारकडे दिला होता. यात पुढे दुकाने, मध्ये पार्किंग व वर आॅफिसेस यानुसार आराखडा होता. यामुळे जिल्हा परिषदेचे उत्पन्नही वाढले असते. या प्रस्तावास सरकारने मंजुरीही दिली. मात्र टेंडर प्रक्रिया सुरू होण्याच्या आतच मध्येच ‘राजकारण’ आल्याने हा विषय मागे पडला. या बांधकामासह दोन्ही इमारतींना जोडणारा छोटा पूलही प्रस्तावित होता. यामुळे कर्मचाºयांना या इमारतीतून त्या इमारतीत येणे-जाणे सुलभ होणार होते. मात्र सगळेच विषय बाजूला पडले. परंतु आजची गरज लक्षात घेता हे विषय पुन्हा कार्यान्वित होणे गरजेचे आहे.
जुन्या इमारतीच्या जागेचा अधिक लाभ घेता येईल
जुन्या इमारतीची नेहमीची किरकोळ दुरुस्ती व गळतीचा त्रास लक्षात घेता या ठिकाणी नवीन इमारत बांधणेच योग्य ठरणार आहे. आता बहुतांश सदस्यांकडे चारचाकी वाहने आहेत. यामुळे नेहमीच ही वाहने रस्त्यावर लागलेली असतात. याचा त्रास वाहतुकीस होतो. सर्वसाधारण सभेच्या वेळी तर वाहनांची खूपच गर्दी होते. यामुळे या जागेवर खाली पार्किंग व वर आॅफिसेस असे बांधकाम झाल्यास अधिकच सोयीचे होईल.
जि.प. अध्यक्षांचे निवासस्थानही जीर्ण
जिल्हा परिषद अध्यक्षांचे निवासस्थानही जीर्ण झाले असून त्याचीही दुर्दशा झाली आहे. पुढे असलेल्या विस्तारित बांधकामाचा काही दिवसांपूर्वीच स्लॅबचा भाग कोसळला. जागोजागी गळती त्यास लागली आहे. यामुळे या ठिकाणीही नवीन इमारत उभारणे गरजेचे आहे. मात्र नवीन इमारत उभारण्याचा विषय निश्चित नसला तरी दुरुस्तीकडेही दुर्लक्ष होत आहे.