लसीकरणानंतर अर्धा तास राहा डॉक्टरांच्या निगराणीखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:12 AM2021-06-22T04:12:26+5:302021-06-22T04:12:26+5:30
रिॲक्शन ओळखण्यासाठी महत्त्वाची वेळ : शहरातील केंद्रांवर स्वतंत्र निरीक्षण कक्ष लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : लसीकरणानंतर अर्धा तास ...
रिॲक्शन ओळखण्यासाठी महत्त्वाची वेळ : शहरातील केंद्रांवर स्वतंत्र निरीक्षण कक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लसीकरणानंतर अर्धा तास डॉक्टरांच्या निगराणीखाली थांबणे अत्यंत महत्त्वाचे असते, पण बरेच लोक या वेळेआधीच केंद्र सोडतात. मात्र, काही रिॲक्शन आल्यास ही वेळ महत्त्वाची असते, त्यामुळे नागरिकांनी किमान अर्धा तास डाॅक्टरांच्या निगराणीखालीच थांबावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
शहरातील ७ तसेच चोपडा येथील एका केंद्रावर ३० ते ४४ वयोगटाचे लसीकरण सुरू झाले आहे. मात्र, शहरात पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्याने महापालिकेचे केंद्र गेल्या दोन दिवसांपासून बंद आहे. रविवारी केवळ रेडक्रॉसचे केंद्र सुरू होते. या वयोगटाचे लसीकरण सुरू झाल्यानंतर आता केंद्रे पुन्हा गजबजली आहेत. याआधी आठवडाभरापूर्वी केंद्रांवर अगदी शुकशुकाट होता. ४५ वर्षांवरील नागरिकांचा प्रतिसाद आता कमी झाला आहे. मात्र, आता लससाठा शिल्लक असल्याने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले जात आहे. शिवाय या वयोगटाचे लसीकरण लवकर संपल्यास पुढील टप्प्याच्या लसीकरणात गर्दी होणार नाही, असा सल्ला टास्क फोर्सनेही यंत्रणेला दिला होता. दरम्यान, प्रत्येक केंद्रात स्वतंत्र निरीक्षण कक्ष असून डॉक्टरांच्या समोरच लस घेतलेले नागरिक बसून असतात, मात्र, नागरिकांनी लस घेतल्यानंतर घरी जायची घाई करू नये, असेही डॉक्टर सांगतात.
आतापर्यंत गंभीर रिॲक्शन नाही
जिल्ह्यात आतापर्यंत लस घेतल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला गंभीर रिॲक्शन आलेली नसल्याचे यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे. मात्र, तरीही लस घेतलेली प्रत्येक व्यक्ती ही अर्धा तास केंद्रावर थांबेल याची आम्ही काळजी घेत असतो, असे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी सांगितले.
लसीकरणानंतर अर्धा तास कशासाठी?
लस घेतल्यानंतर पुढील अर्धा तास संबंधिताला काही रिॲक्शन येत आहेत का, याची तपासणी या वेळेत डॉक्टर करीत असतात, अर्ध्या तासानंतर लस घेतलेल्यांना कही त्रास होतोय का, याची विचारणा डॉक्टर करतात. त्यानंतर मग संबंधिताला सोडले जाते. हा पूर्ण अर्धा तास डॉक्टरांच्या निगराणीखाली राहिल्यानंतर रिॲक्शन आहे का, हे समजू शकते. त्यामुळे हा अर्धा तास केंद्रावर थांबणे आवश्यक असल्याचे प्रमुख वैद्यकीय डॉ. रावलानी यांनी सांगितले.
लस हेच औषध
कोरोनावर सद्य:स्थितीत कोणतेही औषध नाही, मात्र प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लस हेच सद्य:स्थितीत औषध मानले जात आहे. यामुळे शरीरात प्रतिकारशक्ती तयार होऊन व्यक्ती कोविडपासून सुरक्षित राहतो, मात्र तरीही नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे डॉक्टर सांगतात.
कोट
निकषात बसणाऱ्यांनी तातडीने लस घेऊन स्वत:ला सुरक्षित करून घ्यावे. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये संसर्ग अधिक समोर आला आहे. तेव्हा पुढील धोके टाळण्यासाठी लस घेऊन स्वत:ला सुरक्षित करून घ्यावे. त्यासोबतच केंद्रावर डॉक्टरांनी सांगितल्यानुसार अर्धा तास थांबावे.
- डॉ. राम रावलानी, प्रमुख वैद्यकीय अधिकारी
एकूण लसीकरण ६१५११४
पहिला डोस ४७७४३७
दुसरा डोस १३६७७७
३० ते ४५ वयोगटासाठी केंद्र ०८