सप्तश्रृंग गडावर गेलेल्या भाविकाच्या घरात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:16 PM2019-01-04T12:16:22+5:302019-01-04T12:16:56+5:30
जळगावातील घटना
जळगाव : वणी येथील सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या दादाराव देविदास सोनवणे (३६) यांच्या बंद घराचे कुलुप तोडून साडे चार लाख रुपये रोख व ५२ हजार ३०० रुपये किमतीचे दागिने असा पाच लाखांवर ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी ९.३० वाजता जुना खेडी रस्त्यावरील सदाशिव नगरातील सुनंदीनी पार्कमध्ये उघड झाला. याप्रकरणी शनी पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दादाराव सोनवणे हे मुळचे रावेर येथील रहिवाशी असून खते विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे. सदाशिव नगरातील सुनंदीनी पार्कमध्ये पत्नी रुपाली, मुलगी ऋतुजा, समृध्दी व सासु उर्मिला विवेक महाजन यांच्यासह राहतात. दोन्ही मुली पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत असल्याने खोटे नगरमध्येही सोनवणे यांनी भाड्याने घर घेतले आहे. त्यामुळे दोन्ही घरांमध्ये त्यांचे वास्तव्य आहे.
पहाटे चोरी झाल्याचा संशय
दादाराव सोनवणे खोटे नगरातील घरी असताना सकाळी ९.३० वाजता शेजारी राहणारे किरण शिवाजी भावसार यांनी त्यांना फोन करुन मुख्य दरवाजाचे लोखंडी गेटचे कुलुप तुटलेले व दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली. त्यामुळे सोनवणे व पत्नी रुपाली यांनी लागलीच घर गाठले असता घरातील सामान व संसारोपयोगी वस्तू अस्ताव्यस्त होत्या. बेडरुमधील कपाटात ठेवलेले साडे चार लाख रुपये व दागिने गायब झाले होते. पहिल्या घरातील कपाटाला कुलुप नव्हते, तर दुसऱ्या खोलीतील बेडरुमधील तिजोरीलाही चाबी नसल्याने त्यांनी कुलुप लावलेले नव्हते. त्याचा फायदा चोरट्यांना घेतला.
सहायक पोलीस अधीक्षकांची भेट
घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन व शनी पेठचे निरीक्षक विठ्ठल ससे यांनी घटनास्थळी भेट दिली. प्राथमिक चौकशीत ही घरफोडी पहाटे दोन ते चार या वेळेत झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, दादाराव सोनवणे व पत्नी रुपाली यांनी शनी पेठ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला.
परिसरात ३ दिवसात ४ घरफोड्या
सुनंदिनी पार्क परिसरात ३१ डिसेंबर ते ३ जानेवारी या तीन दिवसात चोरट्यांनी चार कुलूपबंद घरे फोडली आहेत. यात नाशिक येथे लग्नाला गेले जितेंद्र शिंपी यांच्याकडे चोरी झाली आहे. शिंपी परतल्यावर नेमका ऐवज किती गेला ते कळू शकेल.
सासुचे तीन तर स्वत:चे दीड लाख
भुसावळ येथील शिवपुर कन्हाळा येथे घराचे बांधकाम सुरु असल्याने सोनवणे यांनी घरासाठी दीड लाख रुपये काढून तिजोरीत ठेवले होते. याशिवाय सासू उर्मिला यांचे तीन लाख रुपये व दागिने हा सर्व ऐवजही तिजोरीत होते. संपूर्ण कुटुंब बुधवारी पहाटे पाच वाजता वणी येथे सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. एकाच दिवसात परत येण्याचे नियोजन असल्याने दर्शन आटोपल्यानंतर धुळेमार्गे सोनवणे मध्यरात्री एक वाजता शहरात दाखल झाले. थंडी जास्त असल्याने सदाशिव नगरात न जाता खोटे नगरातील घरीच थांबण्याचा त्यांनी निर्णय घेतला अन् तोच निर्णय त्यांना महागात पडला.