शर्टावरील स्टीकर अन् रुमालावरील रक्ताच्या डागने केला खुनाचा उलगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:17 AM2021-02-11T04:17:56+5:302021-02-11T04:17:56+5:30
जळगाव : खून झालेल्या अनोळखी व्यक्तीच्या शर्टावर असलेले टेलरच्या स्टीकर व संशयितांच्या तोंडाला बांधलेल्या रुमालावर असलेल्या रक्ताचा डाग या ...
जळगाव : खून झालेल्या अनोळखी व्यक्तीच्या शर्टावर असलेले टेलरच्या स्टीकर व संशयितांच्या तोंडाला बांधलेल्या रुमालावर असलेल्या रक्ताचा डाग या दोन बाबी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी हेरल्या अन् तेथेच खुनाचा उलगडा होण्यासह मारेकरीही निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले. सुतावरून स्वर्ग गाठण्याचा जो प्रकार असतो, अगदी तसाच प्रकार या घटनेत समोर आला आहे. मयताची ओळख पटविण्यासह मारेकरी निष्पन्न करणे असे दुहेरी आव्हान पोलीस यंत्रणेने पेलले व त्यावर मात केली.
रावेर शहरात बऱ्हाणपूर रस्त्यावर २ फेब्रुवारी रोजी सकाळी ३० ते ३५ वयोगटातील अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मृत झालेला व्यक्ती शहरातील नसल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याने त्याची ओळख पटविणे हेच सर्वात मोठे आव्हान पोलिसांसमोर होते, त्यानंतर मारेकरी शोधणे व खुनाचे कारण असे तिहेरी आव्हान पोलिसांसमोर होते. कारण जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनोळखी व्यक्तीचा खून होऊन चार महिन्यांच्यावर कालावधी लोटलेला असताना त्यात ना मृताची ओळख पटली, ना मारेकरी शोधता आले. हेच चित्र डोळ्यासमोर ठेवून दोन दिवस झाल्यावरही मृताची ओळख पटत नसल्याने अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी मृतदेहाची बारकाईने पाहणी केली असता त्यात मयताच्या शर्टावर न्यू रिलायन्स टेलर्स, पैठण रोड, औरंगाबाद असे स्टीकर आढळले. गवळी यांनी हाच धागा पकडून मयताचे शर्ट घेऊन सहायक पोलीस निरीक्षक शीतल नाईक व हवालदार सुका तडवी या दोघांना तातडीने औरंगाबादला टेलरकडे रवाना केले.
शर्ट निघाला हॉटेल मॅनेजरचा
पोलीस टेलरकडे गेले असता त्यांना शर्ट दाखविले. त्या टेलरने वर्षभरात शिवलेल्या शर्टच्या पावत्या काढल्या असता त्या चिठ्ठीवर फक्त मोबाइल क्रमांक होता. पोलिसांनी त्या क्रमांकावरून संबंधितांशी संपर्क असता हा शर्ट औरंगाबादमधीलच एका हॉटेल मॅनेजरला असल्याचे निष्पन्न झाले. त्यांची भेट घेऊन चौकशी केल्यावर त्या मॅनेजरने हा शर्ट चुलत भावाला दिला होता व त्याचे नाव सौरभ गणेश राऊत (रा.गेवराई, जि.बीड) असे असल्याचे निष्पन्न झाले.