अजूनही परिस्थितीला हरविता आले नाही ! ‘लता करे’ यांची व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 04:38 PM2019-03-08T16:38:59+5:302019-03-08T16:42:06+5:30
मॅरेथॉनची हॅट्ट्रीक साधणाऱ्या ‘लता करे’ यांचा ‘लोकमत’शी संवाद
जिजाबराव वाघ
लोकमत न्यूजनेटवर्क
चाळीसगाव, जि.जळगाव : सर्वत्र प्रतिकूल परिस्थितीचेच फास होते. पतीच्या आयुष्याचा डाव अर्ध्यावर राहू नये म्हणून मी तीन कि.मी. धावण्याच्या स्पर्धेत १० हजार स्पर्धकांसोबत अनवाणी धावले आणि जिंकलेही. मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून पतीच्या आजारावर उपचार केला. सलग तीन वर्ष ‘बारामती मॅरेथॉन’ जिंकून हॅट्ट्रीक साधली. मात्र अजूनही परिस्थितीला हरविता आलेले नाही. पुरस्कार आणि सत्कारांना भाकरीची सर येईल का? ६८ वर्षीय लता भगवान करे यांचा हा प्रश्न माणसाला निरुत्तर करतो. एका कार्यक्रमासाठी त्या येथे आल्या असता, त्यांनी त्यांचा खडतर प्रवास ‘लोकमत’शी संवाद साधताना मांडाला. यावेळी मीनाक्षी निकम व संपदा उन्मेष पाटील उपस्थित होत्या.
प्रश्न : धावण्याच्या स्पर्धेत भाग घेण्याचे कारण काय?
लता करे : आम्ही मूळ बुलढाणा जिल्ह्यातले. पोट हातावर. दोन एकर शेतीला नापिकीचा वेढा असल्याने कामाच्या शोधात बारामतीत पोहचलो. तीन मुली, एक मुलगा आणि आजारी पती. असा परिवार. गेल्या १० वर्षांपासून शेतात मजुरीचे काम करतो. २०१३ मध्ये पती भगवान करे यांना हदयविकाराचा झटका आला. त्यांच्या उपचारासाठी पैशांची गरज होती. म्हणूनच पहिले बक्षीस ५० हजार रुपये असणाऱ्या धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला.
प्रश्न : स्पर्धा जिंकल्यानंतर काय झाले?
लता कर े: खरं तर मला फक्त पायी चालणे माहीत होते. पतीचे प्राण वाचविण्यासाठी मी धावले. खास अशी कोणतीच तयारी केली नव्हती. मात्र धावताना बक्षिसाची रक्कम आणि आजारी पतीचा चेहरा सारखा समोर येत होता. अवघी चौथी शिकलेली नववारी पातळ नेसलेली ६३ वर्षांची बाई धावण्याची शर्यत जिंकली. याचे खूप कौतुक झाले. मात्र अजूनही आयुष्याची लढाई सुरुच आहे. कौतुकाचा धुराळा खाली बसला आहे.
प्रश्न : हॅट्ट्रीक कशी साधली ?
लता करे : भाकरीचा चंद्र शोधण्यासाठीच मला धावायचे होते. पती आणि मुलगा खासगी कंपनीत सुरक्षागार्ड म्हणून काम करतात. त्यात पतीला आजाराने घेरलेले. २०१४ आणि २०१५ मध्येही स्पर्धेत धावले. प्रत्येकी वेळी १० हजार स्पर्धकांना मागे टाकून मैदान मारले. विजयाची हॅट्ट्रीक केली. आता कुठे गाळात रुतलेली संसाराची गाडी वाटेवर आली आहे. मात्र मुलाच्या नोकरीचा प्रश्न सुटलेला नाही.
प्रश्न : स्पर्धा जिंकल्यानंतर आयुष्य बदलले का?
लता करे : अजिबात नाही. कौतुक झाले. पुरस्कारही मिळाले. मात्र आयुष्याच्या स्पर्धेत अजूनही परिस्थितीला हरविता आलेले नाही. प्रतिकूल ते अनुकूल हे अंतर पार करण्यासाठी धडपड सुरुच आहे. माझा संघर्ष पाहून तरी मुलाला कायमस्वरुपी नोकरी मिळाली पाहिजे.
प्रश्न : महिलांना काय सांगाल?
लता करे : सध्या कुटुंबात आर्थिक प्रश्न कळीचे झाले आहेत. ताण-तणावही वाढले असून महिला कधी कधी टोकाचे पाऊल उचलून आयुष्य संपवितात. आयुष्य लढून जगण्यातच खरी मौज असते. मरायचं नाय तर लढायचं आणि जिंकायचं, हे परिस्थितीने मला शिकवले. संकटांच्या डोळ्याला डोळा भिडवला की, नवे काही तरी गवसते. महिला जिद्दी असतातच. मी एक महिला असूनही परिस्थितीशी झगडा केला. पुरुषांनीदेखील कोलमडून पडू नये.
‘लता करे’ लवकरच चित्रपट पडद्यावर
हैद्राबादस्थित दिग्दर्शक नवीनकुमार देशबोईना हे लता करे यांच्या जिद्दीची कहाणी पडद्यावर साकारत आहे. ‘लता भगवान करे...एक संघर्षगाथा’ असे या दोन तासांच्या चित्रपटाचे नाव असून, यात मुख्य भूमिका लता करे यांनी केली आहे. त्यांचे पती, मुलगा यांच्याही चित्रपटात भूमिका आहेत. चित्रिकरण पूर्ण झाले असून, एप्रिल महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रभर चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
‘लोकमत’ उभा पाठिशी!
पहिल्यांदा स्पर्धा जिंकल्यानंतर ‘लोकमत’च्या बारामती येथील वार्ताहराने माझी लढाई सर्वांसमोर आणली. माझ्या जगण्याची व्यथा मांडली. ‘लोकमत’ने माझी वेदनाच घरोघरी पोहचवली. मला पावणे दोन लाखांची मदत मिळाली. अडचणीच्या काळात लोकमत पाठिशी उभा राहिला हे ऋण विसरणे शक्य नाही. आता पुरस्कार मिळाले नाहीत, कौतुकही झाले नाही तरी चालेल. पण काहीतरी शाश्वत मदत शासनानेही केली पाहिजे, असे प्रांजळ आर्जव लता करे यांनी केले आहे.