मोठ्या ग्रामपंचायतींमधून उमेदवारी अर्जाबाबत अजूनही अनुत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:11 AM2020-12-27T04:11:53+5:302020-12-27T04:11:53+5:30
जळगाव : जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीला बुधवार, २३ डिसेंबरपासून अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेने खऱ्या अर्थाने सुरुवात ...
जळगाव : जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीला बुधवार, २३ डिसेंबरपासून अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेने खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असली तरी पहिल्या दोन दिवसांत जिल्ह्यात केवळ ७० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीविषयी ग्रामीण भागात मोठा उत्साह असला तरी जळगाव तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींचे चित्र पाहिले तर या ठिकाणाहून उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत अजूनही अनुत्सुकता दिसून येत आहे. तालुक्यात ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, यासाठी अजूनपर्यंत केवळ तीनच अर्ज दाखल झाले आहे.
जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील सर्व तालुका प्रशासन सज्ज झाले आहे. यात २३ डिसेंबरपासून अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेने खऱ्या अर्थाने सुरुवात झाली खरी मात्र पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी २४ रोजी जळगाव तालुक्यात केवळ ममुराबाद, तुरखेडा, चिंचोली येथील प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला.
निवडणूक ४३ ग्रामपंचायती, अर्ज केवळ तीन
जळगाव तालुक्यात ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यात शिरसोली प्र. बो., शिरसोली प्र. न., नशिराबाद, जळगाव खुर्द, कुसुंबा, चिंचोली, रायपूर, कंडारी, असोदा, आव्हाणे, ममुराबाद, फुफनगरी, रामदेववाडी, तरसोद, मन्यारखेडे, उमाळा, वडनगरी, भादली बुद्रूक, कडगाव, भोकर, कठोरा, आवार, सावखेडा बुद्रूक, लमांजन प्रबो, रिधूर, आवार, शेळगाव, म्हसावद, वडली, मोहाडी, वावडदे, जवखेडे आदींचा समावेश आहे. या ४३ ग्रामंपंचायतींमधून ४६३ उमेदवार निवडून द्यायचे आहे. ही संख्या व उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिल्लक राहिलेले दिवस पाहता शेवटच्या तीन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी झुंबड उडण्याची शक्यता आहे. यातही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस अर्थात ३० डिसेंबरला प्राधान्य राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
मोठ्या ग्रामपंचायतींमधून एकही अर्ज नाही
जळगाव तालुक्यातील नशिराबाद, शिरसोली प्र.बो., शिरसोली प्र.न., म्हसावद, वावडदे, आव्हाणे, असोदा आदी मोठ्या ग्रामपंचायतींमधून एकही अर्ज दाखल झालेला नाही. यात ममुराबाद या मोठ्या ग्रामपंचायतमधून केवळ एकच अर्ज दाखल झालेला आहे.