...तरीही भाजपामध्ये अस्वस्थता का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 01:28 PM2019-02-20T13:28:47+5:302019-02-20T13:29:51+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धुळ्यातील जाहीर सभा, शिवसेनेबरोबर झालेल्या युतीवर शिक्कामोर्तब या सकारात्मक गोष्टी घडत असतानाही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. त्याचे पडसाद विविध पातळीवर उमटत आहेत.

Still, is there disorder in BJP? | ...तरीही भाजपामध्ये अस्वस्थता का ?

...तरीही भाजपामध्ये अस्वस्थता का ?

Next



मिलिंद कुळकर्णी

लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे. सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. मात्र त्यात आघाडी अर्थात सत्ताधारी भाजपाने घेतली आहे. भाजपाने गेल्या आठवड्यात दोन मोठे कार्यक्रम घेतले. पहिला कार्यक्रम संघटनात्मक दृष्टया महत्त्वाचा होता. शक्तीकेंद्र प्रमुखांचा मेळावा राष्टÑीय उपाध्यक्ष श्यामसुंदर जाजू यांच्या उपस्थितीत झाला. या मेळाव्याला खान्देशातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. त्यापाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा झाला. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर हा दौरा होईल किंवा नाही, अशी साशंकता असताना मोदी यांची सभा झाली आणि त्यांनी अनेक विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण केले. खान्देशातील रेल्वे, सिंचन योजना, भुयारी गटार योजना अशा योजनांचा त्यात समावेश होता. २१ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भुसावळ येथे येत आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे, भाजपाने सर्वच पक्षांच्या तुलनेत लोकसभा निवडणुकीचे परिपूर्ण नियोजन केले आहे.
एवढे परिपूर्ण नियोजन केलेले असतानाही भाजपाच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये पूर्वीसारखा जोश, उत्साह दिसत नाही. खाजगीमध्ये सुध्दा ‘ आहे मनोहर तरी...’ या भूमिकेत कार्यकर्ते दिसतात. असे का? हा प्रश्नच आहे.
आजच्या घडीला कोणत्याही विद्यमान खासदाराची उमेदवारी निश्चित आहे, असे दिसत नाही. कोणी ठामपणे दावा करताना दिसत नाही. मतदारसंघातील परिस्थितीचा अंदाज घेतला तर नंदुरबार आणि धुळ्यातील विद्यमान खासदारांना काही धोका वाटत नाही. पक्षांतर्गत प्रभावी पर्यायी उमेदवार सुध्दा मतदारसंघात नाही, हे वास्तव आहे. जळगाव आणि रावेरविषयी तसे म्हणता येणार नाही. जळगावात तर एकास तीन अशी स्पर्धा आहे. उन्मेश पाटील, प्रकाश पाटील, उदय वाघ असे तीन तुल्यबळ स्पर्धक आहेत. माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, डॉ.संजीव पाटील यांनीही इच्छा प्रकट केली आहे. दहा वर्षातील कामगिरी मांडताना ए.टी.पाटील यांना मोठे कष्ट घ्यावे लागत आहे. त्या तुलनेत रावेरमध्ये रक्षा खडसे यांच्यादृष्टीने अलिकडे सकारात्मक गोष्टी घडून आल्या आहेत. एकनाथराव खडसे यांचे पक्षश्रेष्ठींशी पुन्हा सूत जुळले आहे. पंतप्रधानांच्या सभेत व्यासपीठावर त्यांना मानाचे स्थान देण्यात आले. त्यांच्या मागणीवरुन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री कार्यालयातील सचिव यांच्यासोबत मतदारसंघातील प्रमुख प्रश्नांविषयी अनुक्रमे जळगाव व मुंबईत स्वतंत्र बैठका घेतल्या गेल्या. पूर्वी रद्द झालेला मुख्यमंत्र्यांचा दौरा आता २१ रोजी होऊ घातला आहे. निवडणुकीतील स्टार प्रचारकांच्या यादीत एकनाथराव खडसे यांचे नाव अग्रभागी असून त्यांना हेलीकॉप्टर देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. याचा अर्थ पक्षश्रेष्ठींना खडसे यांचे महत्त्व पटलेले आहे आणि खडसे यांनीही अधिक न ताणता जुळवून घेण्याचे ठरविलेले दिसते.
असे चित्र असतानाही कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता का? जळगावात मध्यंतरी एकनिष्ठ कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि त्यात आमदार सुरेश भोळे यांच्याविषयी नाराजी व्यक्त झाली. अशीच स्थिती जळगाव जिल्हा परिषदेत आहे. पाच वर्षांपासून केंद्र, राज्य, जिल्हा परिषद आणि आता महापालिकेत सत्ता येऊनही ठोस अशी विकास कामे झालेली नाहीत. कर्जमाफीपासून तर पायाभूत सुविधांपर्यंत संभ्रम, गोंधळ आणि संथगतीने सर्वसामान्य जनता नाराज आणि निराश आहे. प्रशासकीय यंत्रणा आणि जनता यांच्यातील अंतर वाढलेले आहे. मंत्र्यांभोवती असलेला गोतावळा सामान्य माणसापासून तर कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांचा जाचक ठरत आहे. गटबाजी, बेशिस्त वाढली असतानाही त्यासंबंधी दखल घेतली जात नाही. याचा परिणाम निवडणुकीत दिसू शकतो, असा सामान्य कार्यकर्त्यांचा होरा आहे.
काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस पक्ष या परिस्थितीचा लाभ उठविल्याशिवाय राहणार नाही. भाजपा-सेनेतील युती वरवरची आहे, कार्यकर्ते मनापासून काम करणार नाहीत, याची जाणीव असल्याने दोन्ही काँग्रेस त्यादृष्टीने व्यूहरचना आखत आहेत. जनतेच्या नाराजीत भर कशी पडेल, याविषयी समाजमाध्यमांपासून तर आंदोलनापर्यंतचे मार्ग अवलंबले जात आहे. विरोधी पक्ष म्हणून त्यात गैर काहीच नाही.
भाजपा-शिवसेनेच्या युतीची घोषणा मुंबईत झाली तरी शिवसैनिकांना पाच वर्षातील अवमान, अपमानाचा सल जाणवत आहेच. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनीही त्याची कबुली दिलेली आहे. पक्षप्रमुखांचा निर्णय मान्य करायचा म्हटला तरी प्रत्यक्ष निवडणुकीत काय घडेल, याचा भरवसा नाही. अर्थात भाजपाला सुध्दा याची कल्पना आहे. तेही सेनेवर फार अवलंबून राहणार नाही. मतविभाजन टाळण्यासाठी युती आवश्यक होती, हे लक्षात घेऊन भाजपाने पुढाकार घेतलेला दिसतोय
जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेने जोरदार प्रयत्न चालविले होते. माजी आमदार आर.ओ.पाटील यांनी सहा महिन्यांपासून या मतदारसंघात संपर्क अभियान राबविले. तुल्यबळ उमेदवार म्हणून ते निश्चितच चांगली लढत देऊ शकतात. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची पाचोऱ्यात सभा निश्चित झालेली होती, याचा अर्थ आमदार किशोर पाटील व आर.ओ.पाटील यांचे पक्षश्रेष्ठींकडे चांगले वजन आहे. त्यांचा आदेश पाळायचा म्हटला तरी नाराजी दूर कशी होणार?
एकतेचे दर्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धुळ्यातील सभेच्या निमित्ताने भाजपाने एकतेचे दर्शन घडविले. असंतुष्ट नेते एकनाथराव खडसे यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले होते. गिरीश महाजन आणि डॉ.सुभाष भामरे यांनी प्रयत्नपूर्वक ही सभा आयोजित केली आणि यशस्वी करुन दाखवली. विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. स्वपक्षीय आमदार अनिल गोटे यांचा विरोध असूनही भाजपाने धुळ्यात पाय मजबूत रोवले आहेत.

Web Title: Still, is there disorder in BJP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव