खासदारांच्या संपर्क कार्यालयाची अद्याप प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 01:02 PM2019-11-11T13:02:22+5:302019-11-11T13:03:01+5:30
जळगाव : जळगावचे खासदार म्हणून उन्मेष पाटील यांनी निवडून येऊन, सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्याप जळगाव शहरात ...
जळगाव : जळगावचे खासदार म्हणून उन्मेष पाटील यांनी निवडून येऊन, सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्याप जळगाव शहरात खासदारांचे संपर्क कार्यालय न झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
दोन दिवसांपूर्वी खासदारांनी बळीराम पेठेतील भाजपाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क कार्यालय सुरु झाले असल्याचे एका कार्यक्रमात जाहीर केले होते. मात्र खरोखरच खासदारांचे हे कार्यालय चालू झाले का, याबाबत सर्वत्र विविध चर्चा होत्या. त्यामुळे याप्रकरणाची शहानिशा करण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधी भाजपाच्या कार्यालयात गेले असता, तेथे असलेल्या कर्मचाऱ्यांनी खासदार याठिकाणी येतात, मात्र त्यांचे या ठिकाणी कुठलेही कार्यालय सुरु झाले नसल्याचे सांगितले.
जळगाव शहरात जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे या सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांचे संपर्क कार्यालय आहे. मात्र, खासदार उन्मेश पाटील यांचे संपर्क कार्यालय कुठे आहे, असा प्रश्न जळगावकरांतर्फे विचारण्यात येत आहे. काही नागरिक भाजपाच्या कार्यालयात गेले असता, तेथील कर्मचाऱ्यांनी खासदारांचे याठिकाणी कार्यालय नाही, त्यांना भेटण्यासाठी गिरीश महाजनांच्या संपर्क कार्यालयात जाऊन तपास करा, असा सल्ला दिला. त्यामुळे नक्की खासदारांचे कार्यालय जळगावात झाले आहे ना? याबाबत नागरिकही संभ्रमात पडले.
या दोन्ही कार्यालयांमध्ये खासदारांचे कार्यालय अंतर्भूत नाहीच; शिवाय याठिकाणी खासदारांचा कुणीही कार्यकर्ताही नाही. त्यामुळे खासदारांशी संपर्क साधायचा कसा आणि कुठे? असा प्रश्न आता सामान्य जनतेलाही पडला आहे.
तर खासदार म्हणतात कार्यालय सुरु, कर्मचारींही नियुक्त
यासंदर्भात खासदारांशी संपर्क साधला असता, त्यांनी भाजपाच्या बळीराम पेठेतील कार्यालयात संपर्क कार्यालय सुरु झाले आहे. गणेश माळी या व्यक्तीची कर्मचारी म्हणून नियुक्तीही केली आहे. तसेच संपर्क कार्यालयाचा फलकही लावण्यात येणार आहे, असे खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितले.
अन् ‘लोकमत’ प्रतिनिधीला आले रंजक अनुभव
‘लोकमत’ प्रतिनिधी या भाजप कार्यालयात जाऊन तपास केला. त्यावेळी तेथील कर्मचाºयाशी झालेला संवास असा...
प्रतिनिधी : खासदार उन्मेश पाटीलांचे संपर्क कार्यालय येथे आहे का?
कर्मचारी : नाही, हे ग्रामीणचे कार्यालय आहे.
प्रतिनिधी : मग, खासदारांचे कार्यालय कुठे आहे?
कर्मचारी : गिरीश महाजनांचे आॅफीस आहे, त्या ठिकाणी खासदारांचे कार्यालय आहे.
प्रतिनिधी : येथे नाही का मग?
कर्मचारी : नाही येथे नाही..सर्व गिरीश महाजनांच्या कार्यालयात.. तिथे आहे..
यानंतर भाजपा कार्यालयात आलेल्या माजी नगरसेवकांकडे चौकशी केली असता, त्यांनी याठिकाणी सुरु होणार आहे असे मला कळाले आहे. ते कधी सुरु होणार..याबाबत तुम्ही खासदाराशींच बोला, असे त्यांनी सांगितले.