बनावट व मुदत संपलेल्या सिगारेटचा साठा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:16 AM2021-04-22T04:16:38+5:302021-04-22T04:16:38+5:30
सहा जणांवर गुन्हा; ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत जळगाव : मुदत संपलेल्या तसेच बनावट सिगारेट विक्री करणाऱ्या सहा जणांविरुद्ध बुधवारी ...
सहा जणांवर गुन्हा; ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
जळगाव : मुदत संपलेल्या तसेच बनावट सिगारेट विक्री करणाऱ्या
सहा जणांविरुद्ध बुधवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सकाळी दुकानांवर धाड टाकली होती. त्यात ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
भजे गल्लीला लागून असलेल्या भारद्वाज ट्रेडर्स नावाच्या दुकानाच्या शेजारी रिकाम्या खोलीत काही जण बेकायदेशीर बनावट विदेशी व कालबाह्य झालेल्या सिगारेटची विक्री करत असल्याची माहिती जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर, हवालदार मनोज पवार, महेंद्र बागुल, प्रशांत पाठक, विकास पहूरकर व विनोद पाटील यांनी बुधवारी सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. तेथे उपस्थित असलेले नरेंद्र भागवत पाटील (वय ३२), एकनाथ श्रीराम पाटील (वय २४) दोन्ही रा. आव्हाणे, ता. धरणगाव, ललित विलास पांडे (वय ४५) रा. गांधीनगर, जिल्हा पेठ, जयवंत मधुकर बाविस्कर, रा. चांदसर, ता. धरणगाव, प्रेमसिंग नंदसिंग पाटील (वय २६) रा. दादावाडी जैन मंदिराच्या मागे आणि भारद्वाज ट्रेडर्सचे मालक अरूण पुंडलिक पाटील यांना रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातील विदेशी बनावटीच्या आणि मुदत संपलेल्या २९ हजार ८०० रुपयांच्या सिगारेट जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी हवालदार मनोज पवार यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर तपास करीत आहेत.