चोरलेल्या दुचाकी मित्र, नातेवाइकांकडे ठेवल्या गहाण; दोन बुलेटसह ११ दुचाकी हस्तगत
By विलास.बारी | Published: September 13, 2022 11:24 PM2022-09-13T23:24:42+5:302022-09-13T23:25:14+5:30
कारागृहातून सुटताच चोऱ्या
विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आई, वडील आजारी आहेत, असे सांगून चोरलेल्या दुचाकी मित्र व नातेवाइकांकडे पाच ते दहा हजार रुपयांत गहाण ठेवणे व मिळालेल्या पैशात दारूसह मौजमस्ती करणाऱ्या पवन प्रेमचंद पाटील-कुंवर (वय २६, रा. आव्हाणी, ता. धरणगाव) या अट्टल गुन्हेगाराला शहर पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून चोरीच्या दोन बुलेटसह ११ दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. पवन याच्याविरुद्ध वेगवेगळ्या जिल्ह्यात व गुजरातमध्ये १० ते १२ गुन्हे दाखल असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी दिली.
दोन दिवसांपूर्वी कोर्ट चौकात दुचाकी चोरताना पवन याला लोकांनी रंगेहाथ पकडून चोप दिला होता. शहर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने दोन दिवसांत तब्बल ११ दुचाकी काढून दिल्या. त्यात पाच दुचाकी जळगाव शहरातून चोरलेल्या असून, नाशिक व सुरत येथून काही दुचाकी चोरलेल्या आहेत. तीन दुचाकींचे मालक अजून निष्पन्न झालेले नाहीत. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, विजय निकुंभ, भास्कर ठाकरे, प्रफुल्ल धांडे, राजकुमार चव्हाण, रतन गीते, तेजस मराठे व योगेश मराठे यांनी वेगवेगळी चौकशी करून त्याच्याकडून दुचाकींची उकल केली. धरणगाव, चाळीसगाव व इतर तालुक्यात त्याने मित्र व नातेवाइकांकडे या दुचाकी गहाण ठेवल्या होत्या. पवन याचे आई, वडील व भाऊ सुरत येथे वास्तव्यास आहेत. चोरीचे उद्योग करीत असल्याने त्याला आई, वडील घरात घेत नाहीत. त्यामुळे तो आव्हाणी येथे आजीकडे राहतो, असे पोलिसांनी सांगितले. तपासी अंमलदार प्रफुल्ल धांडे यांनी त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
चोरलेली दुचाकी दुसऱ्याने चोरली
पवन याला दुचाकी चोरल्यानंतर मद्यप्राशन व मौजमस्तीची सवय आहे. त्याने चोरलेली दुचाकी एका ठिकाणी लावली होती. मद्यप्राशन झाल्यानंतर दुचाकीजवळ गेला असता ती दुचाकी चोरी झाली होती, असाही किस्सा त्याने पोलिसांना सांगितला. त्याच्याकडून हस्तगत केलेल्या दोन बुलेटपैकी एका बुलेटची साडेतीन लाख रुपये किंमत आहे.