पोट भरण्याची मारामार; मी टॅक्स कशाला भरू?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:18 AM2021-09-21T04:18:53+5:302021-09-21T04:18:53+5:30
विजयकुमार सैतवाल लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोणताही व्यावसायिक असला तरी त्याला आज किमान आपल्या पोटापुरता व्यवसाय झाला पाहिजे, ...
विजयकुमार सैतवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोणताही व्यावसायिक असला तरी त्याला आज किमान आपल्या पोटापुरता व्यवसाय झाला पाहिजे, असे वाटत आहे. त्यामुळे कर भरावा लागेल एवढे उत्पन्न आज येत नसल्याने दररोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असताना कर कसा भरणार, असा प्रश्न विविध व्यवसायिकांकडून उपस्थित केला जात आहे. आपण कर भरत नाही, असे प्रत्येकाला वाटत असले तरी प्रत्येक जण अप्रत्यक्ष कर भरतच असतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
कोरोनाचा संसर्ग उद्भवला आणि त्याचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला. छोटे मोठे व्यावसायिक, रोजंदारी करणारी मंडळी यांचे उत्पन्नाचे साधनच जवळपास हिरावले गेले होते. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने परिस्थिती काहीसी सुधारत असली तरी अजूनही छोटे-छोटे व्यवसाय पूर्णपणे पूर्वपदावर आलेले नाही. या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या व्यावसायिकांशी चर्चा केली असता आज व्यवसाय किती होईल, याची चिंता असते. कर भरावा एवढा व्यवसाय होत नसल्याने कर भरण्याचा प्रश्नच येत नाही, असे अनेकांनी सांगितले. आपण कर भरत नाही, असे या व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. मात्र प्रत्येक जण कर भरत असतो. दोन प्रकारच्या करांमध्ये प्रत्यक्ष कर हा प्राप्तीकर म्हणून करपात्र करदाते भरतातच, सोबतच अप्रत्यक्ष कर हा प्रत्येक जण भरतो यामध्ये कोणताही व्यावसायिक त्याच्या दैंनदिन जीवनातील वस्तू असो की व्यवसायासाठी आवश्यक साहित्य खरेदी करताना त्याची किंमत मोजत असताना त्याद्वारे त्या वस्तूचा कर भरत असतो. त्यामुळे आज सर्वांना कर भरावाच लागतो, असे जाणकारांनी सांगितले.
प्रत्येक जण टॅक्स भरतो
प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर असे कराचे दोन प्रकार असतात. यातील प्रत्यक्ष करामध्ये प्राप्तीकर हा करपात्र व्यक्ती भरत असतातच. या सोबतच अप्रत्यक्ष कर हा प्रत्येक जण भरतो. दैनंदिन जीवनातील वस्तू असो अथवा कोणताही व्यावसायिक त्याच्या व्यवसायासाठी वापरणारे साहित्य खरेदी करताना त्याची किंमत मोजत असताना त्याद्वारे करही देत असतो.
- अनिलकुमार शहा, सी.ए.