दगडी दरवाजा बनतोय धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 10:33 PM2019-08-24T22:33:48+5:302019-08-24T22:33:58+5:30
अमळनेर : शहरातील ऐतिहासिक दगडी दरवाजाचा बुरूज कोसळल्यानंतर तात्पुरता आधार म्हणून मुरूमच्या भरलेल्या गोण्या लावल्या. मात्र आता त्या फाटून ...
अमळनेर : शहरातील ऐतिहासिक दगडी दरवाजाचा बुरूज कोसळल्यानंतर तात्पुरता आधार म्हणून मुरूमच्या भरलेल्या गोण्या लावल्या. मात्र आता त्या फाटून मुरूम खाली पडत आहेत. यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अद्याप प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
पुरातत्व खात्याच्या अखत्यारितील दगडी दरवाजाची वेळोवेळी दुरुस्ती न झाल्याने त्यास पडलेल्या तड्यांमध्ये पावसाचे पाणी शिरत आहे. त्यामुळे बुरूज कोसळण्या धोका वाढत आहे. पावसामुळे काही दिवसांपूर्वीच एक बुरुज कोसळून त्याचा मलबा रस्त्यावर पडला होता. सुदैवाने त्यात अनर्थ घडला नाही. त्यांनतर प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार ज्योती देवरे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने यांनी भेट देऊन तात्पुरते गोण्यांमध्ये मुरूम टाकून त्या बुरुजाच्या कडेला लावल्या. त्यामुळे रस्त्याचा काही भाग झाकला गेला. या बाजूने वाहतूक बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. सद्य:स्थितीत वाहनाचा धक्का लागल्यानेदेखील बुरूजाचा वरचा थर पडू शकतो. यातून अपघाताची शक्यता आहे. दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करणे सुरू असून सार्वजनिक बांधकाम खाते, पुरातत्व विभाग, पोलीस प्रशासन, नगरपालिका यांनी समन्वयाने योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.