दुपारचा वाद मिटवताना रात्री जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या घरावर दगडफेक
By विजय.सैतवाल | Published: May 11, 2024 12:44 AM2024-05-11T00:44:23+5:302024-05-11T00:44:39+5:30
मोहाडी रस्त्यावर रात्रीचा थरार; कारच्या काचा फुटल्या
विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: तालुक्यातील मोहाडी येथे दुपारी दोन गटात झालेल्या वादाविषयी तडजोड करण्यासाठी रात्री दोन गट चर्चा करीत असताना पुन्हा वाद उफाळून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पवन सोनवणे यांच्या घरावर तुफान दगडफेक करण्यात आली. यात त्यांच्या घराच्या खिडकीच्या व दरवाजाच्या काचा फुटल्या असून अपार्टमेंट परिसरातही दगडांचा खच पडला होता. ही घटना शुक्रवार, १० मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मोहाडी रस्त्यावरील इम्पेरियल या अपार्टमेंटमध्ये घडली. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेसह एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पथक तसेच क्यूआरटी पथक दाखल झाले होते. या घटनेने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला.
जळगाव शहरापासून जवळच असलेल्या मोहाडी गावात अक्षय तृतीयेला पत्ते खेळण्याचा डाव सुरू होता. त्यावेळी दोन गटात वाद होऊन हाणामारी झाली. याविषयी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी काहीजण गेले. मात्र तक्रार न देता तेथून ते परत आले. यासंदर्भात दोन्ही गटात तडजोड करण्यासाठी त्यांना मोहाडीरोडवर पवन सोनवणे यांच्या घराजवळ बोलवण्यात आले.
मात्र या ठिकाणी दुपारच्या वादातून दोन गट पुन्हा एकमेकांना भिडले. तसेच त्यांनी शहरातील इतर भागातील काही तरुणांना देखील बोलवून घेतले. दोन गटातील हा वाद वाढत जाऊन संतप्त झालेल्या दोन्ही गटातील व्यक्तींनी एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यास सुरूवात केली. या दगडफेकीमध्ये रस्त्यावर उभी असलेली सोनवणे यांच्या कारचे देखील नुकसान झाले. तसेच पवन सोनवणे यांच्या घरावरदेखील दगडफेक करण्यात आली. त्यांच्या घराच्या गॅलरी आणि खिडकीचे काच फोडले गेले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.कॉ. नाना तायडे, पोउनि गणेश वाघमारे, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, विजय पाटील व अन्य अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहचले. तसेच क्यूआरटीचे दोन पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. रात्री उशिरापर्यंत पोलिस ताफा या ठिकाणी तैनात होता.