अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकावर पुन्हा दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 12:05 PM2020-06-20T12:05:00+5:302020-06-20T12:05:20+5:30
बळीराम पेठेतील घटना : एकावर गुन्हा दाखल, २२ विक्रेत्यांचा माल जप्त, दगडफेकप्रकरणी गुन्हा दाखल
जळगाव : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून शुक्रवारी सकाळी ११ वाजता बळीरामपेठेत कारवाई सुरु असताना, काही विक्रेत्यांनी मनपाच्या पथकावर दगडफेक केली. सुदैवाने या दगडफेकीत मनपाच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला इजा झाली नाही. गेल्या महिन्यातदेखील मनपाच्या पथकावर जोशीपेठेत मोठ्या जमावाने दगडफेक केली होती. शुक्रवारी झालेल्या दगडफेकप्रकरणी एका भाजीपाला विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनपाकडून दररोज अनधिकृत हॉकर्स व अतिक्रमणधारकांवर कारवाईची मोहीम सुरु आहे. मात्र, एकीकडे कारवाई सुुरु असताना दुसरीकडे हॉकर्सदेखील शिरजोर होत जात आहे.
शुक्रवारी मनपाचे पथक बळीरामपेठ भागात कारवाईला पोहचल्यानंतर अनेक विक्रेत्यांनी धावपळ न करता व्यवसाय सुरुच ठेवला. त्यानंतर मनपाकडून कारवाईला सुरुवात झाल्यानंतर काही विक्रेत्यांनी मनपा कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत कारवाईला विरोध केला. त्यातच गुरुवारच्या कारवाईत हातगाडी जप्त करण्यात आलेल्या काही विक्रेत्यांनीही या वादात सहभाग घेत मनपा कर्मचाºयांशी हुज्जत घातली. त्यातच परशुराम गवळी नामक विक्रेत्याने मनपा कर्मचाºयांवर अचानक दगडफेक करण्यास सुरुवात केली.
अचानक सुरु झालेल्या दगडफेकीमुळे मनपा कर्मचाºयांनी संरक्षणासाठी पळापळ केली. काही वेळाने हा वाद आटोक्यात आला. त्यानंतर मनपाच्या पथकाने २२ विक्रेत्यांवर कारवाई करत हातगाड्या व माल जप्त केला.
दरम्यान, दगडफेकप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.