नशिराबाद येथे दोन गटांत दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:16 AM2021-05-15T04:16:12+5:302021-05-15T04:16:12+5:30
जळगाव : नशिराबाद येथे शुक्रवारी दुपारी २ वाजता लहान मुलांच्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून वाद झाला. यामुळे दोन गट समोरासमोर ...
जळगाव : नशिराबाद येथे शुक्रवारी दुपारी २ वाजता लहान मुलांच्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून वाद झाला. यामुळे दोन गट समोरासमोर आल्याने जमावाकडून दगडफेक झाली. यात दोन्ही गटांतील पाच जण जखमी झाले असून, त्यांच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत ३२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेत दगडांशिवाय लाठ्या-काठ्यांचासुध्दा वापर झाला.
शुक्रवारी दुपारी लहान मुलांमध्ये भांडण झाले. या भांडणावरून वाद उफाळला. काही वेळातच दोन गट समोरासमोर आले आणि दगडफेकीला सुरुवात झाली. एवढेच नव्हे तर दोन्ही गट लाठ्या -काठ्या घेऊन एकमेकांच्या अंगावर धावून आले व हाणामारी झाली. या घटनेमुळे नशिराबादमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच, नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळ गाठले. नंतर घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांनी घेतली. दोन्ही गट पिंजारी समाजाचे असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती.
जखमींवर उपचार सुरू
याप्रकरणी ३२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत असून, पाच जण जखमी आहेत. त्यांच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती नशिराबाद पोलिसांनी ‘लोकमत’ला दिली. लहान मुलांच्या भांडणावरून दगडफेक होऊन हाणामारी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.