मनसे कार्यकर्त्याचा दगडाने ठेचून निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:43 PM2019-08-26T12:43:21+5:302019-08-26T12:44:31+5:30

ईश्वर कॉलनीतील थरारक घटना ; कृपाळू साईबाबा मंदिराच्या आवारात आढळला रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

Stoned murder of MNS activist in stone | मनसे कार्यकर्त्याचा दगडाने ठेचून निर्घृण खून

मनसे कार्यकर्त्याचा दगडाने ठेचून निर्घृण खून

Next

जळगाव : मनसेचा माजी उपाध्यक्ष असलेला घनश्याम शांताराम दीक्षित (३६, ईश्वर कॉलनी) या तरुणाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना रविवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली. घनश्याम याच्या घरापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या कृपाळू साईबाबा मंदिराच्या आवारात रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह आढळून आला. शेजारीच रक्ताने माखलेले दगड होता.
दरम्यान, या खुनाशी संबंधित सनी उर्फ चाळीस वसंत पाटील (रा.रामेश्वर कॉलनी) व मोहनीराज उर्फ मोन्या अशोक कोळी (रा.सबजेल मागे, जळगाव) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांनी दुपारी पाळधी, ता.जामनेर येथून अटक केलीे. उसनवारीचे दहा हजार रुपये व दारुच्या नशेत वाद झाल्याने त्यातूनच ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
पत्नीला सांगितले भाजी गरम करायला
रात्री १२ वाजता घनश्याम घरी आला.तत्पूर्वी त्याने पत्नी भाग्यश्री हिला ‘मला जेवण करायचे आहे तु भाजी गरम करुन ठेव’ असे फोन करुन सांगितले. घरी आल्यावर त्याने दुचाकीचा हॉर्न वाजविला. तेव्हा वरच्या मजल्यावर असलेला लहान भाऊ गणेश हा बाथरुममध्ये आला. अंगणात दुचाकी (क्र.एम.एच.१९ बी. के.१९९०) पाहिली. भाऊ घरात गेला असावा म्हणून तो झोपून गेला.

रात्री उशिरापर्यंत हॉटेलमध्ये रंगली पार्टी अन् वाद
1) मृत घनश्याम व त्याचा गल्लीतील मित्र सुधीर महाले हे दोघं भजे गल्लीतील एका हॉटेलमध्ये दारु प्यायला बसले होते. त्यांच्याच शेजारच्या टेबलवर मोन्या व त्याचा मित्र जयंत पाटील असे बसले होते. तु माझ्या टेबलवर ये या कारणावरुन मोन्या व घनश्याम यांच्यात तेथे वाद झाले. या वादानंतर रात्री ११.३० वाजता मोन्या तेथून घराकडे यायला निघाला तर घनश्याम व महाले दोघं जण स्वतंत्र दुचाकीने १२ वाजता घरी आले. महाले घरी गेला तर घनश्याम घराजवळ गेल्यावर त्याला मोन्या शेजारी कृपाळू साईबाबा मंदिराच्या आवारात घेऊन गेला.मोन्या याने सनी उर्फ चाळीस याला भांडण सोडविण्यासाठी बोलावून घेतले. तेथे दोघांमध्ये आणखी वाद झाला, त्यात मोन्या याने घनश्याम याच्या डोक्यात दगड टाकला. त्यात तो जागीच गतप्राण झाला. घनश्याम रक्ताच्या थारोळ्यात व गतप्राण झाल्याचे पाहून दोघांनी तेथून लगेच दुचाकीने पळ काढला. पोलिसांनी ही दुचाकीही जप्त केली आहे.

सनी खुनाच्या गुन्ह्यात जामीनावर
2) सनी उर्फ चाळीस हा २०१५ मध्ये चंद्रकांत पाटील या तरुणाच्या खुनाच्या गुन्ह्यात चेतन उर्फ चिंग्यासोबत संशयित आरोपी आहे. त्याशिवाय खुनाचा प्रयत्न केल्याचाही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.

विना परवानी रास्ता रोको करणाऱ्या महिलांविरुध्द गुन्हा
3) मनसेचा माजी उपाध्यक्ष घनश्याम दीक्षित या तरुणाच्या खून प्रकरणात आरोपींना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी जिल्हा रुग्णालयासमोर विना परवानगी रास्ता रोको आंदोलन व निदर्शने केल्याप्रकरणी विविध संघटनांच्या महिला व पुरुष अशा १५ ते २० जणांविरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला भादवि कलम ३४१, १८८ व मुंबई पोलीस कायदा कलम ३७(१)(३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोभा चौधरी, सरिता माळी, रेखा पाटील, मनिषा पाटील,ज्योती शिवदे, माधुरी जगदाळे, वंदना पाटील, उषा पाटील, राहूल शालिक मिस्तरी, बापु कुमावत व श्रीराम सुतार यांच्यासह १५ ते २० जणांविरुध्द हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस कर्मचारी उमेश पाटील यांनी फिर्याद दिली आहे. या सर्वांनी जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असताना रस्त्यावर बसून ‘आरोपींना अटक झालीच पाहिजे’, ‘पोलीस प्रशासन हाय हाय’ व ‘पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांची बदली झालीच पाहिजे’ अशा घोषणा दिल्या होत्या.

तीन तासानंतर पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला
अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम, एमआयडीसीचे निरीक्षक रणजीत शिरसाठ, उपनिरीक्षक संदीप पाटील, राजकुमार ससाणे, सहायक फौजदार अतुल वंजारी, मनोज सुरवाडे, राजेंद्र कांडेकर, विजय पाटील, गोविंदा पाटील, यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यासाठी पोलिसांनी अनेक सरकारी अधिकाऱ्यांकडे पंच मिळण्यासाठी विनंती केली, मात्र तीन तास शासकीय पंच मिळाला नाही, त्यामुळे तितका वेळ मृतदेह जागेवरच पडून होता. १० वाजता शासकीय पंच आल्यानंतर पावणे अकरा वाजता मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

मृतदेह पाहताच फोडला बहिणीने हंबरडा
सकाळी ६ वाजता आई शोभाबाई यांनी मुलगा गणेश याला भाऊ घनश्याम रात्री घरी आला नाही असे विचारुन चौकशी करायला सांगितले. त्यानुसार गणेश याने मोबाईलवर संपर्क केला असता रिंग वाजत होती, मात्र प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे गणेश याने भावाचा मित्र चंदू सोनवणे याला फोन केला असता त्याने तो रात्री माझ्यासोबत नव्हता, असे सांगितले. त्यामुळे गणेश हा दुसºया गल्लीत राहणारा त्याचा मित्र सुधीर महाले याच्या घरी गेला, त्याने आम्ही दोघं जण रात्री सोबत घरी आलो व नंतर आपआपल्या घरी गेलो असे सांगितले. महालेकडून चौकशी करुन घरी येत असतानाच गणेश याला कृपाळू साईबाबा मंदिराकडे गर्दी दिसली. त्याने गल्लीतील ललीत काठेवाडी याला गर्दीबाबत विचारले असता मंदिराच्या आवारात कोणाचा तरी मृतदेह असल्याचे सांगितले. त्याने हा प्रकार आई बहिण यांना सांगितला. दोघं जण मंदिराकडे गेले असता बहिण ममता रडत येताना दिसली व तो मृतदेह भावाचाच असल्याचे निष्पन्न झाले.
 

Web Title: Stoned murder of MNS activist in stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.