कुऱ्हे (पानाचे) येथे सीसीआय केंद्रासमोर शेतकऱ्यांचा दोनदा रस्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 08:43 PM2020-12-10T20:43:51+5:302020-12-10T20:45:30+5:30
कुऱ्हे (पानाचे ) येथील सुशिला जिनिंग प्रेसिंगसमोर कापसाच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांनी गुरुवारी दोन वेळेस रास्ता रोको आंदोलन केले.
भुसावळ : तालुक्यातील कुऱ्हे (पानाचे ) येथील सुशिला जिनिंग प्रेसिंगसमोर कापसाच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांनी गुरुवारी दोन वेळेस रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
कुऱ्हे (पानाचे) येथे दोन जिनिंगमध्ये कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. सुरुवातीला आठवड्यातून तीन दिवस कापूस मोजण्यात आला. मात्र गेल्या आठवड्यातून फक्त गुरुवार व शुक्रवार असे दोनच दिवस कापसाची खरेदी होत होती. त्यातही गुरुवारी खरेदी बंद असल्याने आठवड्यातून एकच दिवस कापसाची खरेदी होत असल्याने एका दिवसात एवढा कापूस कसा मोजला जाईल, असा प्रश्न उपस्थित झाला.
आठ दिवसापासून येथे शेतकऱ्यांनी कापूस मोजणीसाठी आणला आहे. मात्र गुरुवारी निराशा झाली. दुपारपर्यंत केंद्रप्रमुखाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांनी अखेर एक वाजता कापसाच्या भरलेल्या वाहनांना भुसावळ-जामनेर रस्त्यावर उभे कले व व रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित वाहनांना टोकन देऊन कापूस मोजला जाईल, असे आश्वासन दिले व आंदोलन तात्पुरते मागे घेतले. मात्र चार वाजेपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने कापूस खरेदी केली नाही. त्यामुळे पुन्हा आठवडाभर थांबावे लागेल का, या विचाराने शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन करत कापसाच्या भरलेल्या वाहनांना रस्यांवर उभे केले व केंद्रप्रमुखाच्या आडमुठ्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आज तालुक्यातील कापूस खरेदीचा दिवस असून केंद्रप्रमुख जामनेर तालुक्यातील केंद्रावर थांबून जामनेर तालुक्यातील कापसाची वाहणे मोजत होते. त्यामुळे केंद्रप्रमुखांचे भुसावळ तालुक्यापेक्षा जामनेर तालुक्यावर अधिक प्रेम असल्याचे दिसत होते. ते कोणाच्या दबावाखाली काम करत आहे का, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित झाला.
शेतकऱ्यांच्या मागण्या
कापसाची नियमित व दररोज खरेदी करावी
टोकन देताना जे वाहन अगोदर आले त्यांना टोकन द्यावे
येथे व्यापाऱ्यांना टोकन विक्री होत असल्याची तक्रार आहे
चांगल्या प्रतीच्या कापसाला कोणतीही कपात/कट्टी लावू नये
नाव नोंदणी कापूस खरेदी केंद्रावरच केली जावी
मोजलेल्या कापसाची पावती त्याच दिवशी खरेदी केंद्रावरच देण्यात यावी
सहायक पोलीस निरीक्षक रूपाली चव्हाण यांच्या मध्यस्थीने मिटवला वाद
शेतकऱ्यांनी भुसावळ-जामनेर रस्त्यावर सुशीला जिनिंगजवळ रस्ता रोको आंदोलन केल्यामुळे शेकडो वाहने रस्त्याच्या दुतर्फा लागलेली होती. याची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनच्ळा सपोनि रुपाली चव्हाण, अमोल पवार, युनुस शेख व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेतकर्यांच्या आंदोलनाला शांत करत मध्यस्थी केली. शेतकऱ्यांनीसुद्धा तक्रारीचा पाढा सपोनि चव्हाण यांच्या पुढे मांडला. कायदा हातात घेऊ नका, असे आवाहन करीत संबंधित अधिकार्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधना व त्यांना तत्काळ कापसाची खरेदी करण्यास सांगितले. त्यामुळे केंद्रप्रमुख यांच्या प्रमुख कर्मचाऱ्यांनी सुशीला जिनिंग गाठून शेतकऱ्यांचे भरलेल्या बैलगाड्यांमधील कापसाची खरेदी करण्यास संध्याकाळी सुरुवात केले. त्यामुळे हा वाद अखेर मिटला.
आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूनेच विचार करीत आहोत. त्यांचा रोष आम्ही समजू शकतो. जामनेर तालुक्यात तीन ते चार दिवस कापसाची मोजणी केली जाते. परंतु आपल्या भुसावळ तालुक्यात फक्त एक किंवा दोनच दिवस कापसाची मोजणी होते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची तक्रार वरिष्ठ पातळीवर केली जाईल व आठवड्यात नियमीत कापसाची खरेदी व्हावी यासाठी पाठपुरवठा करीत आहे.
-नितीन पाटील, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, भुसावळ
आमचे ही वाहने आठ दिवसापासून खरेदी केंद्रावर असून आम्हाला आठ दिवसानंतर आज टोकन पावती दिली. तरीसुद्धा वाहने मोजणी झाले नाही. शासनाने वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन केंद्र प्रमुखाचा मनमानी कारभार थांबावा, आठवडाभर दररोज वाहने मोजणी करावी. यासाठी आंदोलन केले.
-अतुल पाटील, शेतकरी