शासकीय काम अन् दहा वर्षे थांब? एकनाथ खडसे यांनाच आला अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 05:11 AM2020-09-27T05:11:35+5:302020-09-27T05:12:04+5:30
कपात सूचनेला दहा वर्षांनी उत्तर
जळगाव : ‘शासकीय काम आणि वर्षभर थांब..’ या म्हणीचा प्रत्यय प्रत्येकाला जवळपास आयुष्यात वारंवार येत असल्याने ‘अत्यावश्यक’ कारणाशिवाय शासकीय कामाच्या कुणीच भानगडीत पडत नाही. आता हे झाले सामान्य माणसाचं! पण, भाजप नेते एकनाथ खडसे यांनी आरोग्य विभागातील झालेल्या गैरव्यवहाराचे उत्तर त्यांना १० वर्षांनी मिळाले आहे.
त्याचे झाले असे, खडसे यांनी २०१०मध्ये तत्कालीन आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. गुप्ता यांच्याविरोधात तक्रार केली होती. केंद्र शासनाने हिवताप नियंत्रणासाठी राज्याला पाठवलेल्या ३ लाख गोळ्यांचा उपयोग न करता गुप्ता यांनी राज्य शासनाच्या तिजोरीतून २२ लाखांच्या गोळ्या खरेदी केल्या. तसचेच २००२-०३मध्ये या वर्षात औषध खरेदीस आरोग्य सेवा संचालनालयाची मान्यता नसतानाही व अनुदान नसतानाही त्यांनी १ कोटी ३५ लाख रुपयांची औषध खरेदी केली. विभागीय चौकशीत दोषी आढळूनही गुप्ता यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती, असे खडसे यांचे म्हणणे होते. डॉ. गुप्ता यांच्याविरुध्द तक्रारीही झाल्या, पण कारवाइ झाली नाही. हा विषय २०१०च्या हिवाळी अधिवेशनात कपात सुचनेव्दारे खडसे यांनी मांडला होता. त्याचे उत्तर त्यांना १० वर्षांनी मिळाले. विशेष म्हणजे, सामान्य प्रशासन विभागाच्या सहमतीने तत्कालीन आरोग्य मंत्र्यांच्या मान्यतेने डॉ. गुप्ता यांना दोषमुक्त करण्यात आले आहे.