पर्यायी रस्त्यासाठी २७ रोजी रेल्वे रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:10 PM2019-03-23T12:10:42+5:302019-03-23T12:11:06+5:30
शिवाजीनगर बचाव समितीच्या सभेत रहिवासी एकटवले
जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपूलाच्या कामाला आमचा विरोध नाही, प्रशासनाने पर्यायी रस्ता उपलब्ध करुन देणे, ही आमची मागणी आहे. या यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत पत्रव्यवहार केला. तरीदेखील पर्यायी रस्ता मिळाला नाही. प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत असून, वेळेवर उपचार न मिळाल्याने आठवडाभरात तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असून, पर्यायी रस्त्यासाठी येत्या २७ मार्च रोजी रेल्वे रोको करण्याचा निर्धार शिवाजीनगर बचाव संघर्ष समितीच्या शुक्रवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत करण्यात आला. या वेळी बैठकीला उपस्थित नागरिकांनी प्रशासन व लोक प्रतिनिधी यांच्यावरही तीव्र संताप व्यक्त केला.
जीर्ण झालेल्या शिवाजीनगर पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे शिवाजीनगर भागातील रहिवाशांना सुरत रेल्वे गेटमार्गे मोठ्या फेऱ्यातून प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर बचाव संघर्ष समितीतर्फे २२ मार्च रोजी सायंकाळी शिवाजीनगरातील क्रांती चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर समितीचे अध्यक्ष दीपककुमार गुप्ता, राजेंद्र गाडगीळ, कार्याध्यक्ष इमरान शेख, उपाध्यक्ष मजहर पठाण, विजय बादल, सचिव जहागीर. ए. खान, सहसचिव शेख इकबाल शेख वजीर, कोषाध्यक्ष रमेश जोगी यांच्यासह नरेंद्र पिठवे, मसूद खान चाँद खान उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला राजेंद्र गाडगीळ यांनी पर्यायी रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून,रेल्वे रुळ ओलांडून जावे लागत आहे. रेल्वेच्या कामाला आमचा विरोध नाही. रेल्वे प्रशासनाने रहिवाशांचा त्रास लक्षात घेता, तात्काळ पर्यायी रस्ता उपलब्ध करण्याची मागणी केली. यानंतर विलास सांगोरे यांनी पर्यायी रस्ता उपलब्ध केल्यानंतरच पुलाचे काम सुरु करायला हवे होते. पर्यायी रस्ता नसल्यामुळे, नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.
प्रशासनाला वारंवार विनंती करुनही, लक्ष दिले जात नाही. त्यामुळे आपल्या मागण्यासांठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.
यानंतर दीपककुमार गुप्ता यांनी सांगितले की, पुलाच्या कामाला एक महिना होत असून, रेल्वे प्रशासनाने फक्त ५ इंचाचा पूल खोदला आहे. अतिशय संथ गतीने काम सुरु आहे. प्रशासनाने नागरिकांना विश्वासात घेतलेले नाही, नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु असून, या आता पर्यायी रस्ता झाल्याशिवाय मागे न हटण्याचे आवाहन नागरिकांना केले. तसेच ‘टी’ आकाराच्या पूलालाही विरोध असून, याविरोधात आवाज उठविण्याचे सांगितले.
रेल्वे प्रशासनासह ज्यांना आपण निवडून देतो, त्या लोकप्रतिनिधींचेही आपल्याकडे लक्ष नाही. त्यांनीदेखील शिवाजीनगरातील नागरिकांचा विश्वासघात केला असल्याचे संतप्त नागरिकांनी सांगितले.
पर्यायी रस्त्यासाठी दोन विद्यार्थिनींनी दाखल केली याचिका
पर्यायी रस्ता व्हावा, यासाठी आपल्या दोन मुलींनीदेखील न्यायालयात पुर्नयाचिका दाखल केली असल्याची माहिती दीपककुमार गुप्ता यांनी सांगितले. माझी एक मुलगी इयत्ता १२ व लहान मुलगी १० इयत्ता शिकते. त्यांनादेखील रेल्वे रुळ ओलांडून शाळेत जावे लागत आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला शाळेत जाण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करुन देण्या संदर्भात याचिका दाखल केली असून, यावर पुढील आठवड्यांत कामकाज असल्याचे सांगितले.