आरटीओ कॅम्पमध्ये गोंधळ, रास्ता रोको
By admin | Published: March 1, 2017 12:13 AM2017-03-01T00:13:28+5:302017-03-01T00:13:28+5:30
जामनेर : वाहन परवान्यासाठी गर्दी वाढल्याने वाहनधारक संतप्त
जामनेर : येथील शासकीय विश्रामभवनात मंगळवारी वाहन परवाना काढणा:या वाहनधारकांची प्रचंड गर्दी झाल्याने उपस्थित दोघा सहायक मोटार वाहन निरीक्षकांनी रांगेतील फक्त 100 नागरिकांच्या परवान्याबाबत कार्यवाही केली व उर्वरितांना तुम्ही पुढील महिन्यात या, असे सांगितल्याने मोठा गोंधळ उडाला. मात्र अधिकारी ऐकत नसल्याने उपस्थित नागरिकांनी अखेर जामनेर-जळगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील, बी.ङोड.जाने व सहका:यांनी धाव घेऊन नागरिकांची समजूत घातली. रास्ता रोको होत असल्याचे पाहून दोघा वाहन निरीक्षकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
प्रत्येक महिन्याच्या 28 तारखेला जामनेर शहरात आरटीओचा कॅम्प होतो. यामुळे शिकाऊ व कायम असे दोन्ही परवाने काढण्यासाठी वाहनधारकांची गर्दी होते. मंगळवारी सकाळपासूनच नागरिक विश्रामभवनात थांबून होते. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे अधिकारी आल्यानंतर त्यांनी गर्दी पाहून सर्वाना रांगेत उभे केले व त्यातील 100 जणांचे अर्ज स्वीकारले व राहिलेल्यांना पुढील महिन्यात या, असे सांगितले. यानंतर गोंधळ वाढला. परवाने काढण्यासाठी बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांनी वाहन निरीक्षकांना घेराव घालून जाब विचारला. आम्ही फक्त दोघेच असल्याने 100 जणांचे अर्ज स्वीकारले.
दीड वाजेनंतरही हा गोंधळ सुरूच होता. अशातच त्रस्त नागरिकांनी विश्रामभवनसमोरून जाणारा जामनेर-जळगाव रस्ता अडवून रास्ता रोको आंदोलन केले व अधिका:यांविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली. हा प्रकार वाढतच असल्याचे पाहून कुणीतरी पोलिसांना ही माहिती दिली. उपनिरीक्षक विशाल पाटील, बी.ङोड. जाने यांनी या ठिकाणी येऊन नागरिकांची समजूत घातली. या वेळी पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य अमर पाटील उपस्थित होते.
दरम्यान, रास्ता रोको आंदोलन सुरू होताच दोघा मोटार वाहन निरीक्षकांनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांसमोरसुद्धा या वाहन निरीक्षकांनी आपली बाजू मांडली.
जामनेर तालुका हा भौगोलिकदृष्टय़ा मोठा असून 170 गावे आहेत. प्रत्येक महिन्यात वाहन परवाना काढणा:यांची नेहमीच मोठी गर्दी होते. परिवहन विभागाने शेंदुर्णी किंवा पहूर या ठिकाणीदेखील कॅम्प घ्यावा, असे उपस्थितांचे म्हणणे होते. (वार्ताहर)
वाहन नोंदणी व परवाना काढणा:या नागरिकांनी कॅम्पच्या ठिकाणी न येता परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी व त्यांना हव्या असलेल्या दिवसाची अपॉईंटमेंट घेऊन कार्यालयात यावे. या सुविधेमुळे नागरिकांचा मोठा त्रास वाचतो. जिल्ह्यात फक्त 10 मोटार वाहन निरीक्षक असल्याने एका दिवशी फक्त एक अधिकारी 100 जणांचे अर्ज स्वीकारून कार्यवाही केली जाते. गर्दीतला त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी ऑनलाइन सुविधेचा लाभ घ्यावा.
-अतुल पवार,
सहायक मोटार वाहन निरीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय
सकाळी आठ वाजेपासून परवाना काढण्यासाठी रांगेत उभा होतो. मात्र मोटार वाहन निरीक्षकांनी फक्त 100 जणांचेच अर्ज स्वीकारले व आम्हाला पुढील महिन्यात येण्यास सांगितले. उपप्रादेशिक परिवहन विभागाने जादा निरीक्षकांची नेमणूक करावी म्हणजे काम जलद गतीने होईल.
-मंगलसिंग राजपूत, काळखेडे, ता.जामनेर
जिल्ह्यात जामनेर तालुका मोठा असल्याने महिन्यातून दोन वेळेस कॅम्प झाला पाहिजे. कॅम्पसाठी विभागाने जादा मोटार वाहन निरीक्षक पाठविल्यास नागरिकांचे काम लवकर होईल. परवाना नूतनीकरण, शिकाऊ व कायम परवाना काढणा:यांची गर्दी वाढते, गोंधळ होतो. हे टाळण्यासाठी कार्यवाही होणे गरजेचे आहे. -अमर पाटील, तालुकाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा