कजगावात पाणी प्रश्नावर रास्ता रोको

By admin | Published: March 9, 2017 12:17 AM2017-03-09T00:17:25+5:302017-03-09T00:17:25+5:30

२५ दिवसांनी नळाला पाणी : महिलादिनी महिलांनी हंडा डोक्यावर घेत केले आंदोलन

Stop the water issue in Kajagat | कजगावात पाणी प्रश्नावर रास्ता रोको

कजगावात पाणी प्रश्नावर रास्ता रोको

Next

कजगाव : अनेक  दिवसापासून गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत अनेक तक्रारी वीज वितरण कंपनीला करुनही हा प्रश्न सुटला नाही.  दिवसेंदिवस होत असलेल्या या त्रासाला कंटाळून अखेर जागतिक महिलादिनी ८ रोजी सकाळी साडेआठ वाजता गावातील महिलांनी हंडा डोक्यावर घेत रास्तारोको केला.  हे आंदोलन दोन तास सुरू होते. यामुळे वाहतुकीचाही मोठा खोळंबा झाला. अखेर तहसीलदार, पोलीस अधिकारी घटनास्थळी आल्यावर  या आंदोलनाची सांगता झाली.
 गत चार-पाच महिन्यापासून या पाणी योजनेला कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने पाणीपुरवठा पंप सुरु होत नाही. त्यामुळे कजगावचा पाणीपुरवठा बंद पडल्यासारखा आहे. कधीतरी पाणी येत असल्याने पाणी प्रश्न बिकट झाला आहे.  साधारणत: २५-३० दिवसानंतर पाणीपुरवठा होत असल्याने महिलांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. गिरणा नदी भरभरुन वाहात आहे. तरीदेखील कजगावकर मात्र तहानलेले आहेत.
तक्रारींकडे दुर्लक्ष
गेल्या महिन्यात ग्रा.पं. सदस्य अनिल महाजन व ग्रामस्थांनी लोणपिराचे येथे वीज वितरण कंपनी कार्यालयात वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत निवेदन दिले होते. नंतर भडगाव येथील वीज कंपनीच्या कार्यालयालाही निवेदन दिले होते.  वीज कंपनी कार्यालयाकडून या तक्रारीची कोणतीही दखल घेतली गेली नाही.  त्यामुळे संतप्त महिला व ग्रामस्थांनी ८ रोजी रस्ता रोको आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले. ८ रोजी सकाळी पावणेदहा वाजता गावातील महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन रस्ता रोको केला. हळूहळू आजूबाजूच्याही महिला सहभागी झाल्या. तसेच ग्रामस्थही या आंदोलनात आल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली.  कजगाव-चाळीसगाव, कजगाव-भडगाव, कजगाव-पारोळा, कजगाव-नागद हे चारही रस्ते बंद झाले होते.
रस्ता रोकोबाबत  कळताच पोलीस प्रशासन व तहसीलदार, वीज वितरण कंपनी, पं.स. कार्यालयातील अधिकारी घटनास्थळी आले. पोनि दत्तात्रय परदेशी, भडगावचे उपकार्यकारी अभियंता शर्मा, तहसीलदार सी.एम.वाघ यांनी आंदोलनकर्त्यांची बाजू समजून घेतली.
महिला व ग्रामस्थांनी  २५-३० दिवसांनी पाणी मिळते. त्यामुळे होणाºया त्रासाबद्दल कैफियत मांडली. हा प्रश्न  आज न सुटल्यास येथून हलणार नाही असा पवित्रा संतप्त महिलांनी घेतला. सायंकाळी ५वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असे ठोस आश्वासन तहसीलदारांनी दिले. यानंतरच रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.  आंदोलन सव्वा अकरापर्यंत चालले. दीड तासापर्यंत झालेल्या आंदोलनामुळे विवाह समारंभाला जाणाºयांना याचा  फटका बसला.
बीडीओची दांडी
गावात पाणी प्रश्नासाठी रस्तारोको सुरू झाला आहे. याची माहिती मिळूनही भडगाव पं.स.चे गटविकास अधिकारी यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवली. ते आंदोलनस्थळी न आल्याने बराच वेळ त्यांच्याविरुध्द घोषणा दिल्या. ही बाब भ्रमणध्वनीद्वारे  त्यांना लक्षात आणून दिली. तरीही त्यांनी हजेरी लावली नाही. यामुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.
स्व.भरतसिंग पाटील यांची झाली आठवण
 बचुअप्पा यांनी कजगावच्या सरपंचपदाची धुरा अनेक वर्ष सांभाळली. कजगावकरांच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी अनेक आंदोलने  गाजली. स्व.भरतसिंग पाटील यांचे आंदोलन हे गावाच्या  अडचणीसाठी असायचे.  त्यानंतर अनेक वर्षानंतर पाण्यासाठी कजगावकरांनी  दीड तास रस्ता रोको आंदोलन केले प्रसंगी प्रत्येक नागरिकांना स्व.भरतसिंग पाटील यांच्या आंदोलनाची आठवण होत होती.
व्यापारपेठही बंद
पाण्यासाठी रस्तारोको सुरू होताच कजगावच्या व्यापाºयांनी यात सहभाग घेत दुकाने बंद करुन पाठिंबा दिला. व्यापारपेठही बंद झाली. आंदोलन संपल्यानंतर ही दुकाने पूर्ववत सुरू झाली.
वीज वितरण कार्यालयात बैठक
या आंदोलनानंतर कजगाव वीज वितरण कार्यालयात अधिकाºयांच्या उपस्थितीत बैठक  झाली.  कजगाव ग्रा.पं.ला कायमस्वरुपी  ग्रामविस्तार अधिकारी मिळावा अशी मागणी करण्यात आली. दोन दिवसात   गटविकास अधिकाºयांना पत्र देतो असे  तहसीलदार वाघ यांनी सांगितले.                    
                                 (वार्ताहर)
८ मार्च रोजी देशभरात महिला दिन मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. मात्र याच दिवशी कजगावच्या शेकडो महिलांना डोक्यावर हंडे घेऊन रस्ता रोको करावा लागला.
महिला सरपंचांनी दिला राजीनामा
 दरम्यान, कजगावच्या सरपंच लता निकम यांनी ८ रोजी आपल्या पदाचा राजीनामा गटविकास अधिकारी यांच्याकडे दिला आहे.   त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे की   गावात विविध विकास कामे  राबवित असतांना काही  सदस्य अडथळा निर्माण करीत आहेत. त्यामुळे विकास कामे होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये  नाराजी आहे.

Web Title: Stop the water issue in Kajagat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.