चोपड्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 01:08 AM2019-02-13T01:08:29+5:302019-02-13T01:12:10+5:30
चोपडा : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी यूनियन, आणि आयटकतर्फे अंगणवाडी सेविका, मदतनीस व बचत गटांच्या विविध मागण्यांसाठी येथील ...
चोपडा : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी यूनियन, आणि आयटकतर्फे अंगणवाडी सेविका, मदतनीस व बचत गटांच्या विविध मागण्यांसाठी येथील धरणगाव चौफूलीवर मंगळवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सुमारे अर्धा तास चाललेल्या या रास्ता रोकोमुळे रस्त्यावर अनेक वाहने थांबल्याने ट्राफिक जाम झाली होती. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मोदी सरकारने सप्टेंबर २०१९९ मध्ये जाहीर केलेली मानधनवाढ तर द्यावीच पण मध्यप्रदेश प्रमाणे किमान दहा हजार रू मानधन द्यावे, सरकारी कर्मचाºयांचा दर्जा द्यावा, मुलांचा खाऊचा दर्जा सुधारणेसाठी किमान २५ रुपये दर करा, टाकाऊ टीएचआर बंद करा, दहिवद येथील सेविकांना खाऊ पुरविल्याचे थकित पैसे द्या प्रकल्पांमधील रिक्त पदे भरण्यात यावीत, किमान पाच हजार रुपये पेंशन द्या, अशा अनेक मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कॉ. अमृत महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी सरकारी धोरणावर जोरदार टीका केली. या रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व कॉ. महाजन यांच्यासह ममता महाजन, वत्सला पाटील यांनी केले. आंदोलनावेळी कॉ. गोरख वानखेडे, सिंधू पाटील, ज्योती चौधरी, बेबी कोळी, कल्पना पाटील, पुष्पा मोरे, प्रतिभा पाटील, सुरेखा जोशी, सरला कोळी, मंगला देवराज, शशिकला बाविस्कर , सरला देशमुख, लता पाटील, दिव्यश्री बाविस्कर संध्या पाटील, निता पाटील, अनिता धनगर, सुरेखा पाटील, वैशाली पाटील, छाया कोळी आदींचा आंदोलनात सहभाग होता. या आंदोलनाने परिसर चांगलाच दणाणला होता.