विविध मागण्यांसाठी जळगावात मालवाहतूकदारांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 01:54 PM2018-07-27T13:54:56+5:302018-07-27T13:55:29+5:30
जोरदार घोषणाबाजी
जळगाव : गेल्या आठवडाभरापासून विविध मागण्यासांठी आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँंगेस नवी दिल्लीतर्फे: देशव्यापी बेमुदत संप सुरु असून या संपात जळगाव जिल्ह्यातील ५०० वाहतूकदारांनी सहभाग घेतला आहे. मात्र, सरकारतर्फे आठवडाभरापासून कुठल्याही मागण्या मान्य न झाल्यामुळे शहरातील माल वाहतूकदारांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता अजिंठा चौकात रास्ता रोका आंदोलन करुन सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपासून डिझेलच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने, ट्रान्सपोर्ट धारकांना व्यवसाय करणे अवघड झाले आहे. तसेच गेल्या काही महिन्यांपासून ई-वे बिलची प्रक्रिया अमलात आणली असून, ट्रन्सपोर्ट धारकांंना मालाची डिलीव्हरी करतांना ई-वे बिलांमधील बी नावाचा फार्म भरणे भरुन, संबंधीत मालाची पावती जवळ बाळगणे गरजेचे आहे. मात्र, या बिलात नजरचुकीने चूक झाल्यास गाडीमध्ये जितक्या किंमतीचा माल असेल, तितक्या किंमतीचा दंड आकारण्याची तरतूद आहे. तसेच टोलमाफी न झाल्यामुळे हा व्यवसाय अधिकच अडचणीत आल्याने, मालवाहतूक दारांनी मागण्या मान्य होईपर्यंत हा संप सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यांत परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे झालेल्या बैठकीत कुठलाही तोडगा न झालेल्या जळगाव जिल्हा मालवाहतूक दार संघटनेचे अध्यक्ष पप्पू बग्गा यांच्या नेतृत्वाखाली अजिंठा चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात जिल्हाभरातील मालवाहतूकदार व हमाल बांधव सहभागी झाले होते. या वेळी सरकारतर्फे कुठल्याही मागण्या मान्य होत नसल्यामुळे सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी उपाध्यक्ष अशोक वाघ, सचिव राधेश्याम व्यास यांच्यासह बशीर राणानी, अरुण दलाल, नईम मेमन यांच्यासह हमाल बांधव उपस्थित होते.