वादळी पावसाने उडाली दाणादाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:13 AM2021-05-29T04:13:44+5:302021-05-29T04:13:44+5:30
देवळी येथे आज सकाळी झालेल्या मेन लाईनमध्ये इलेक्ट्रिक फाॅल्ट झाल्याने निंबा महाला पाटील यांचा मालकीची बैलजोडी घरासमोर बांधलेली होती ...
देवळी येथे आज सकाळी झालेल्या मेन लाईनमध्ये इलेक्ट्रिक फाॅल्ट झाल्याने निंबा महाला पाटील यांचा मालकीची बैलजोडी घरासमोर बांधलेली होती व थोड्या अंतरावर तीन ते चार गायी बांधलेल्या होत्या. त्यापैकी एका बैलावर विजेची मेन तार पडल्याने बैल जागीच ठार झाला. अशीच एक घटना काही अंतरावर असलेल्या दादाभाई फकिरा पिंजारी यांच्या पत्र्याच्या घरावरदेखील मेन तार पडल्याने मोठा अनर्थ टळला. त्यांचे सारे कुटुंब घरातच होते. तार घरावर पडताच मेन स्विच खाली पडल्यामुळे जीवित हानी टळली. वीज वितरणच्या भोंगळ कारभारामुळे हा प्रसंग ओढविल्याची नागरिकांनी तक्रार केली. कारण जीर्ण तारा बदलल्या जात नसल्याने असे प्रसंग होत असतात.
घरावरचे पत्रे उडाले
वादळामुळे शेतातील घराचे पत्रे उडाल्याने शेतमजूर कुटुंब उघड्यावर आले आहे. वाऱ्याचा झोत घरात शिरताच पत्रे उडून १०० ते १५० फुटांवर फेकले गेले. आम्ही जीव मुठीत धरून घराबाहेर पडलो, तर बाहेर प्रचंड वारा व पाणी पाहून आम्ही झाडाचा आश्रय घ्यायला गेलो, तर क्षणार्धात ते झाडही मुळासकट पडले, सुदैवाने बचावलो अशी आपबीती त्या शेतमजुराने सांगितली.
अधिकाऱ्यांची भेट
शुक्रवारी दुपारी एक वाजता देवळी तळेगाव गटाचे जि. प. सदस्य अतुल देशमुख, या गणाचे पं. स. सभापती अजय पाटील, तालुका कृषी अधिकारी सी. डी. साठे, गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, आडगावचे सरपंच रावसाहेब पाटील. तलाठी नगीना कोल्हेकर, कृषी सहायक पगार, ग्रामसेवक विजय पाटील यांनी पाहणी केली. यावेळी जि. प. सदस्य अतुल देशमुख संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काय काय मदत करता येईल यांची माहिती घेतली.