वादळाने केले १३ हजार १०६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:17 AM2021-03-26T04:17:33+5:302021-03-26T04:17:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मंगळवारी सायंकाळी जिल्ह्यात झालेल्या जोरदार वादळी वारे आणि अवकाळी पावसाने जिल्ह्यातील १३ हजार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मंगळवारी सायंकाळी जिल्ह्यात झालेल्या जोरदार वादळी वारे आणि अवकाळी पावसाने जिल्ह्यातील १३ हजार १०६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे. त्यात आठ तालुक्यात २४७ गावांमधील २० हजार १५९ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. भडगाव, जामनेर, चाळीसगाव आणि एरंडोल या गावांना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे.
जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाने त्याचा अहवाल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना पाठवला आहे. यात बागायत पिके ज्वारी, गहू, मका, बाजरी, हरभरा, कांदा, तीळ, सूर्यफुल, शेवगा, इतर भाजापीला, यांच्यासोबतच फळपिके केळी, पपई, लिंबू व इतर फळांच्या बागांचे देखील नुकसान झाले आहे. यात जळगाव तालुक्यात ४, भडगावला ५०, पाचोरा २४, जामनेर ५०, चाळीसगाव ४८. पारोळा १५, एरंडोळ ५५ आणि धरणगाव तालुक्यात एका गावात नुकसान झाले आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका हा मका या पिकाला बसला आहे. या आठ तालुक्यांमध्ये ३ हजार ९६९ हेक्टरवरील मक्याचे नुकसान झाले आहे. तर त्यासोबतच बाजरी, हरभरा आणि कांद्यालादेखील मोठा फटका बसला आहे. एरंडोल तालुक्यात तीळ आणि सूर्यफुल या दोन तेलबियांच्या पिकांना या वादळाने साफ आडवे केले. एरंडोल तालुक्यात ४३ हेक्टरवरील तीळ आणि ७७ हेक्टरवरील सूर्यफुलाचे नुकसान झाले आहे.
मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी वारे आणि पावसाने या नुकसानीचा पंचनामा तातडीने कृषी विभागाने केला आणि गुरुवारी याचा अहवाल जिल्हाधिकारी राऊत यांना सादर करण्यात आला आहे.