वादळी तडाख्याने पळापळ, विक्रेत्यांना मोठा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:16 AM2021-03-21T04:16:15+5:302021-03-21T04:16:15+5:30

जळगाव : जोरदार वारा, गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरासह तालुक्यात मोठे नुकसान झाले असून, विक्रेत्यांना मोठा फटका बसला आहे. ...

The storm hit hard, hitting vendors hard | वादळी तडाख्याने पळापळ, विक्रेत्यांना मोठा फटका

वादळी तडाख्याने पळापळ, विक्रेत्यांना मोठा फटका

Next

जळगाव : जोरदार वारा, गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरासह तालुक्यात मोठे नुकसान झाले असून, विक्रेत्यांना मोठा फटका बसला आहे. या वादळात शहरात वृक्षांच्या फांद्या तुटून पडण्यासह विद्युत खांबही कोसळले. यामुळे अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला. दरम्यान, शहरात ठिकठिकाणी खोदलेल्या रस्त्यांवर पाणी साचल्याने व चिखल झाल्याने शहरवासीयांचे मोठे हाल झाले.

शनिवारी दुपारपासूनच ढगाळ वातावरण झाले होते. संध्याकाळी अगोदर थंड वारे वाहू लागले, नंतर या वाऱ्यांचा वेग चांगलाच वाढला व जोरदार पावसाला सुरुवात झाली. सोबत अनेक ठिकाणी गारपीटही झाली.

संध्याकाळी बाजारपेठेत दुकानदारांची यामुळे मोठे हाल झाले व ग्राहकांचीही पळापळ झाली. संध्याकाळी अनेक जण खरेदीसाठी बाहेर आल्याने, ते या पावसात सापडले. त्यामुळे अनेकांनी दुकानांवर थांबून आधार घेतला. यात अनेक जण भर पावसात घरी निघाले. छोट्या व्यावसायिकांना आपली दुकाने आवरत असतानाच माल ओला झाल्याने त्यांचे चांगलेच नुकसान झाले.

‘वीकेण्ड’वर पाणी

गेल्या आठवड्यात जनता कर्फ्यूमुळे अनेक जण घराबाहेर पडले नव्हते. त्यामुळे या आठवड्यात अनेक जणांनी संध्याकाळी बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला होता. मात्र, जोरदार पाऊस व वादळाने त्यावर पाणी फिरले. अनेक खाद्यपदार्थ विक्रेत्यांचेही यात नुकसान झाले. अनेक भागांत गारपीटही झाली. अनेकांनी गारा गोळा करण्याचा आनंद लुटला.

वीज गुल

संध्याकाळी पावसाला सुरुवात होताच, शहरातील विविध भागांत वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे अनेक भागात अंधार पसरला होता. या सोबतच वडली, म्हसावद, वावडदा, पाथरी या भागातही वादळामुळे विजेचे खांब कोसळून वीजपुरवठा खंडित झाला.

झाडांच्या फांद्या कोसळल्या

शहरातील अनेक भागात जोरदार वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. चिमुकले श्रीराम मंदिराजवळ भररस्त्यावर झाडाची फांदी पडली होती. या सोबतच योगेश्वर नगरातही फांदी तुटून पडली.

चिखलामुळे नागरिक हैराण

शहरात अमृत योजनेच्या कामासाठी ठिकठिकाणी रस्ते खोदण्यात आल्याने, त्यामुळे नागरिक हैराण असताना, आता ज्या ठिकाणी खड्डे होते तेथे पावसाचे साचले गेले. या शिवाय जेथे खड्डे बुजले आहेत, त्या ठिकाणी चांगलाच चिखल झाला व त्यातून मार्ग काढताना वाहनधारक व पादचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली.

Web Title: The storm hit hard, hitting vendors hard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.