गुलाबराव पाटील यांचे निवासस्थान असलेल्या पाळधीत तुफान दगडफेक; एक जण जखमी गावात तणावपूर्ण शांतता; पोलीस दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 12:02 AM2023-03-29T00:02:54+5:302023-03-29T00:03:15+5:30
Crime News: राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निवासस्थान असलेल्या पाळधी गावात मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास तुफान दगडफेक झाली. दगडफेकीत तीन कारचे नुकसान झाले तर एक जण जखमी झाला आहे.
- विलास बारी
जळगाव: राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निवासस्थान असलेल्या पाळधी गावात मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास तुफान दगडफेक झाली. दगडफेकीत तीन कारचे नुकसान झाले तर एक जण जखमी झाला आहे. घटनास्थळी पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला असून, गावात तणावपूर्ण शांतता आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव येथून मार्गस्थ झालेली एक दिंडी पाळधी गावातील एका धार्मिक स्थळाजवळून जात असताना अचानक दिंडीवर दगडफेक सुरु झाली. त्यामुळे दिंडीतील भाविक सैरभर झाले. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर गावातील अन्य काही जणांनीही दगडफेक सुरु केली. त्यात एक जण जखमी झाला. हल्लेखोरांनी काही दुकानांचीही तोडफोड केली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाळधी दूरक्षेत्राचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला पांगवत शांतता प्रस्थापित केली. रात्री उशिरापर्यंत गावात तणावपूर्ण वातावरण होते. पोलिसांचा अतिरिक्त फाैजफाटा दाखल झाला होता.