अमळनेर येथे तुकाराम गाथा पारायणाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 07:11 PM2019-04-28T19:11:03+5:302019-04-28T19:16:55+5:30
संत सखाराम महाराज समाधी द्विशताब्दी महोत्सवानिमित्त सुरू असलेल्या तुकाराम गाथा पारायणाची रविवारी सांगता झाली. यावेळी या पारायणात ३०० भाविकांनी सहभाग घेतला.
अमळनेर, जि.जळगाव : संत सखाराम महाराज समाधी द्विशताब्दी महोत्सवानिमित्त सुरू असलेल्या तुकाराम गाथा पारायणाची रविवारी सांगता झाली. यावेळी या पारायणात ३०० भाविकांनी सहभाग घेतला.
सामाजिक उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या नेत्र चिकित्सा व रक्तदान शिबिरासाठी कांताई नेत्रालयाच्या सहकार्याने १२५ रुग्णांची तपासणी करून मोतीबिंदू शस्रक्रिया करण्यात आली, तर रक्तदान शिबिरात आज ७० बॉटल्या रक्त संकलित करण्यात आले. याशिवाय दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, रविवारीदेखील सायकल रिक्षा, कमोड खुर्ची, व्हील चेअर्स, वाकर्स , कुबड्या आणि काठ्या आदींचे संत प्रसाद महाराज यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
दुपारच्या सत्रात जळगाव येथील दादा महाराज जोशी यांचे सखाराम महाराजांवर सुश्राव्य प्रवचन झाले. सायंकाळी सात वाजता तीन दिव्यांचा दीपोत्सव करण्यात आला. त्या दरम्यान लाईट बंद केल्याने तीन हजार दिव्यांचा उजेड पूर्ण पसरून सभागृहात प्रसन्नता जाणवत, यावेळचे दृश्य विलोभनिय दृश्य निर्माण झाले होते. रात्रीच्या कीर्तन सत्रात चंद्रशेखर महाराज यांचे कीर्तन झाले. त्यांच्या कीर्तनात भाविक मंत्रमुग्ध झाले. रविवारी सुटी असल्याने सुमारे १५ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.