महसूल विभागाचा अजब कारभार, विहीर झाली उताऱ्यावरून गायब...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:18 AM2021-07-29T04:18:17+5:302021-07-29T04:18:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खडकदेवळा, ता. पाचोरा : तालुक्यातील सारोळा शेत शिवारात शेतजमीन असलेल्या ८४ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खडकदेवळा, ता. पाचोरा : तालुक्यातील सारोळा शेत शिवारात शेतजमीन असलेल्या ८४ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने कोणत्याही स्वरूपाचे कर्ज घेतलेले नसताना त्यांच्या सातबारा उताऱ्यावर दोन लाख रुपये कर्जाची नोंद करून व उताऱ्यावरील शेतातील चक्क विहीर वीजपंपाची नोंद गायब करण्याचा अफलातून प्रताप येथील महसूल विभागाने केला आहे. वृद्ध शेतकऱ्याने याबाबत माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली, तरीदेखील त्यांना माहिती न देता त्यांचा मानसिक छळ केला जात असल्याची व्यथा नारायण जगताप या शेतकऱ्याने मांडली आहे.
पाचोरा येथील कोंडवाडा गल्लीत राहणाऱ्या नारायण जगताप (८४) यांची सारोळा बु. (ता. पाचोरा) शिवारात गट. क्र. ९७ मध्ये शेतजमीन आहे. त्यांच्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर सारोळा बु. विविध कार्यकारी सोसायटीचा चक्क दोन लाख रुपये कर्जाचा बोजा असल्याची नोंद तलाठ्याकडून करण्यात आली. त्याबाबत विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. ही नोंद व बोजा कोणी बसवला? कोणत्या बँकेचे कर्ज, कोणत्या तारखेला घेतले? याबाबतच्या कागदपत्रांची मागणी नारायण जगताप यांनी तहसीलदारांकडे केली. परंतु त्याबाबत कोणताही खुलासा आजपर्यंत करण्यात आलेला नाही.
सातबारा उताऱ्यावरील शेतातील विहीर व त्यावरील वीजपंप याबाबतची नोंद कोणी व का रद्द केली? याबाबतची माहिती मागण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा अर्जही घेण्यात येत नसल्याची व्यथा नारायण जगताप यांनी बोलतांना सांगितली.
१५ ऑगस्टला आंदोलनाचा इशारा
महसूल विभागाच्या या अफलातून प्रतापामुळे मानसिक छळ व मनस्ताप वाढला आहे. याबाबत योग्य ती चौकशी करून कारवाई करावी. न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नारायण जगताप यांनी दिला आहे.
फोटो कॅप्शन्स
शेतकरी नारायण जगताप हे उताऱ्यावरील गायब असलेली विहीर व कर्जाच्या बोजाचा उतारा दाखविताना दिसत आहेत. (छाया : आत्माराम गायकवाड)
280721\img_20210728_195016.jpg
महसूल विभागाचा अजब कारभार विहिर झाली उताऱ्यावरुण गायब..