पारोळ्यात मुख्याधिकारी उतरल्या रस्त्यावर, भाजीपाला मार्केट झाले स्थलांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 06:38 PM2021-04-15T18:38:49+5:302021-04-15T18:40:09+5:30
गर्दी कमी करण्यासाठी मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील ह्या पोलिसांच्या लवाजम्यासह थेट रस्त्यावर उतरल्या व आधी बाजारपेठ ठेलागाडी मुक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : बुधवारपासून शासनाने संचारबंदी सुरू केली. यात कुठेही गर्दी होणार नाही याची काळजी स्थानिक पातळीवर प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश होते; परंतु १५ रोजी पारोळा बाजारपेठेत नागरिकांनी भाजीपाला व इतर साहित्य घेण्यासाठी खूप गर्दी केली. ही गर्दी कमी करण्यासाठी मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील ह्या पथक व पोलिसांच्या लवाजम्यासह थेट रस्त्यावर उतरल्या. आधी बाजारपेठ ठेलागाडी मुक्त केली. सर्व भाजीपाला मार्केटच एनईएस हायस्कूलच्या मैदानावर व बालाजी पार्क या ठिकाणी स्थलांतरित केला.
संचारबंदीच्या पूर्वसंध्येला शहरातील सर्व भाजीपाला विक्रेते व ठेलागाडीधारक यांची पालिकेच्या सभागृहात मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील यांनी बैठक घेतली. त्यात संपूर्ण भाजीपाला मार्केट हे बाजारपेठेत न भरविता तो एनईएस हायस्कूलच्या मैदानावर व बालाजी पार्क या दोन्ही ठिकाणी भरविण्यात यावा. सकाळी सर्व भाजीपाला लिलाव हे हायस्कूलच्या मैदानावर झालेत. पण ज्या भाजीपाला व्यावसायिकांची दुकाने आहेत, त्यांनी भाजीपाला विक्री बाजारपेठेत सुरू केला. मग मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील यांनी पालिका कर्मचारी व पोलिसांच्या पथकाच्या मदतीने सर्व ठेलागाड्या या बाजारपेठेतून बाहेर काढल्या.
नंतर सर्व दुकानदारांना त्यांच्या दुकानातच भाजीपाला विका, दुकानाबाहेर वा ठेलागाडी लावून भाजीपाला विक्री करता येणार नाही. नाहीतर गुन्हा दाखल करू, असे सांगितले. त्यावर जवळपास सर्वच भाजीपाला विक्रेत्यांनी भाजीपाला विक्रीसाठी शाळेच्या मैदानावर येऊन व्यवसाय करण्याचे पसंत केले.
मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील यांनी बाजारपेठ ठेलागाडीमुक्त करीत गेल्या कित्येक दिवसांनंतर बाजारपेठेने मोकळा श्वास घेतला. या पथकात मुख्याधिकारी पाटील यांच्यासह संदीप साळुंखे, अभियंता काकडे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील साळुंखे, होमगार्ड प्रभाकर पाटील, नंदू राजहंस, पालिका कर्मचारी, पोलीस व होमगार्ड बांधव होते.