काढलेल्या गतिरोधकामुळे खड्डयांमध्ये भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 12:46 PM2019-11-04T12:46:12+5:302019-11-04T12:47:06+5:30
असून अडचण नसून खोळंबा : कर भरणाऱ्या नागरिकांच्या नशिबी खडड््यांचा फेरा सुटता सुटेना
जळगाव : शहरातील ८५० अनधिकृत गतिरोधक तोडायला मनपाने गेल्या महिन्यापासून सुरुवात केली आहे. गतीरोधक मुक्त शहर करायला गेलेल्या महापालिकेच्या ढिसाळ कारभाराची प्रचिती जळगावकरांना येत आहे. मनपाकडून गतीरोधक काढल्यानंतर त्या ठिकाणचा रस्ता समतल केला जात नसल्याने आता गतीरोधकाच्या ठिकाणी भलेमोठे खड्डे तयार होत असल्याने गतिरोधकांची समस्या ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे.
महापालिकेकडून शहरातील रस्त्यांवर उभारण्यात आलेले सर्व गतिरोधक हे अनधिकृत असून, याबाबत सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीनंतर जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने शहरातील सर्व गतिरोधक काढण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मनपाकडून १६ आॅक्टोबरपासून शहरातील सर्व ८५० गतीरोधक काढायला सुरुवात झाली. अजूनही ही मोहीम सुरुच असून, काही भागातील गतीरोधक काढण्यात आले आहेत. तर काही ठिकाणचे गतीरोधक अद्याप कायम आहेत. अनेक ठिकाणी मनपाकडून गतीरोधक काढताना रस्ता खरडला जात आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी आधी गतीरोधक होते अशा ठिकाणी आता खड्डे तयार झाले आहेत. शहरात आधीच रस्ते कमी आणि खड्डे जास्त आहेत, अशा परिस्थितीत गतिरोधक काढण्याचे काम व्यवस्थित होत नसल्याने वाहनधारकांच्या अडचणीत अधिकच भर पडत आहेत.
गतीरोधक काढण्याचे आदेश देवून अधिकारी रजेवर
मनपा प्रशासनाने गतीरोधक काढण्याचे आदेश दिल्यानंतर काही दिवस गतीरोधक काढण्याचे काम व्यवस्थित सुरु होते.
मात्र, दिवाळीनंतर हे काम थांबलेले दिसून येत आहे. तर काही ठिकाणी ओबङ-धोबड पध्दतीने हे काम सुरु आहे. मनपाचे बांधकाम विभागाचे अभियंताही रजेवर गेल्याने या कामाकडे कोणाचेही लक्ष दिसून येत नाही.
कलेक्टर व एसपी कार्यालयासमोर व्यवस्थित काम
मनपाकडून शहरातील गतिरोधक काढण्याचे काम सुरु आहे. मात्र, काव्यरत्नावती चौक ते स्टेडीयम कॉम्पलेक्सपर्यंतच्या रस्त्यावर मनपाकडून व्यवस्थित काम झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व एसपी आॅफीस समोर गतिरोधक काढून रस्त्याशी समतल जागा करण्यात आली आहे. मात्र, इतर ठिकाणी असे चोख काम होताना दिसत नसून, एक तर गतिरोधक अपूर्ण काढले आहेत तर काही ठिकाणी गतिरोधक काढून जास्तच खड्डा पाडला आहे.
उपनगर व इतर रस्त्यांवर परिस्थिती खराब
गणेश कॉलनी, शिवाजी नगर, चित्रा चौक परिसर, रिंगरोड या भागातील रस्त्यांवरून गतीरोधक काढण्याचे काम ओबड-धोबड पध्दतीने झालेले दिसून येतआहे. याठिकाणी काम करताना जेसीबीव्दारे गतिरोधकाचे डांबरचे गोळे तसेच रस्त्यात पडू दिले जात आहेत. मनपाकडून रस्त्यांची दुरुस्तीही केली जात नाही तर दुसरीकडे गतीरोधक काढण्याचे काम देखील व्यवस्थित होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.