मानसिक ताण वाढला, जगायचे कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 11:26 PM2021-05-08T23:26:35+5:302021-05-08T23:26:54+5:30
आर्थिक अडचणींमुळे चिंता : कोरोना संकटाने सर्वच वयोगटातील व्यक्ती तणावात जळगाव : गेल्या वर्षभरापासून ओढावलेली कोरोनाची स्थिती आर्थिक ...
आर्थिक अडचणींमुळे चिंता : कोरोना संकटाने सर्वच वयोगटातील व्यक्ती तणावात
जळगाव : गेल्या वर्षभरापासून ओढावलेली कोरोनाची स्थिती आर्थिक घडी विसकटणारी तर आहेच सोबतच प्रत्येकाच्या मानसिक आरोग्यावरदेखील परिणाम करीत आहे. एक तर कोरोना आजाराची चिंता व त्यात निर्बंधामुळे व्यवहार ठप्प होऊन विस्कटलेली आर्थिक घडी यामुळे प्रत्येकाची चिंता वाढली असून सर्वजण मानसिक तणावात आहे.
कोरोनाच्या काळात सततचे दडपण व भीती आहे. कोरोनाने निर्माण केलेल्या संकटाला गेल्या वर्षभरापासून सर्वजण सामोरे जात आहे. मध्यंतरी रुग्णसंख्या घटली होती. मात्र फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले व सर्वांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे.
कोरोना काळात ब्रेक द चेन अर्थात निर्बंधाचा सामना नागरिकांना करावा लागत असून त्यातूनच अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मुळात गेल्या शंभर ते दोनशे वर्षांत कोणत्याही पिढीने एवढे मोठे आव्हान पाहिले नाही. त्यामुळे विविध बाजूंनी सध्या कोरोनाच्या परिणामांबाबत चर्चा सुरू झाली आहे.
जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यासह मृतांचा आकडासुद्धा वाढत असल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातूनच मानसिक आजारांचे प्रमाणसुद्धा वाढले आहे.
विशेष म्हणजे ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे ते किमान मानसोपचारतज्ज्ञांकडे जाऊन उपचार तरी करू शकतात, परंतु कष्टकरी तसेच ज्यांचे हातावर पोट आहे त्यांची अवस्था वाईट झाली आहे.
पुरुष सर्वाधिक तणावात
मोलमजुरी असो अथवा इतर कोणतेही काम करीत असताना त्यातून घरातील कर्ता पुरुष कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत असतो. मात्र सध्या निर्बंधामुळे हाताला काम नसल्याने पुरुषवर्ग सर्वाधिक तणावात आहे.
तरुणांच्या चिंता वेगळ्याच
शिक्षणक्षेत्र पूर्णच कोलमडले आहे. शैक्षणिक वर्ष हवे की शिक्षण हवे, या नादात शिक्षणसुद्धा झाले नाही व शैक्षणिक वर्षसुद्धा संपले आहे. त्यामुळे महाविद्यालयीन तरुणांच्या चिंतेत भर पडली आहे.
विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर याचे परिणाम दिसून येत आहेत.
आता शैक्षणिक वर्ष वाया जात असल्याने आयुष्यातील एक-एक वर्ष देखील कमी होत आहे. त्यामुळे कमी वयात अधिक शिक्षणासाठी धडपडणाऱ्या तरुणांना चिंता लागली आहे.
आता शिक्षण थांबले तर भविष्यात नोकरीचा प्रश्न देखील उद्भवणार आहे, या विचारात तरुणवर्ग आहे.
नोकरी गेली काय करावे
कोरोना संसर्गामुळे अनेक व्यवहारांवर परिणाम झाला असून यात अनेकांच्या पगारात कपात झाली तर अनेकांच्या नोकरीदेखील गेल्या आहे. त्यामुळे हा वर्ग मोठ्या तणावात आहे.
कोण म्हणतं पुरुष व्यक्त होत नाही?
कोणतेही संकट आले तरी पुरुष सहजासहजी त्याविषयी बोलत नाही व आपली चिंता दाखवत नाही, असे चित्र असते.
मात्र कोरोनाच्या या संकटाने पुरुष वर्गदेखील आता मोकळेपणाने आपल्या समस्या मांडत आहे. यात गेल्या वर्षापेक्षा आता जास्त प्रमाणात पुरुष व्यक्त होताना दिसत आहे.
मानसोपचार तज्ज्ञांकडे आल्यानंतर पुरुष मंडळी एक तर आर्थिक प्रश्नाविषयी मत व्यक्त करतात तर अनेक जण नोकरी विषयी समस्या मांडतात. याखेरीज कोरोना आजार झाला तर कुटुंबात प्रत्येक जण विचार करीत असल्याचेदेखील पुरुष मंडळी सांगत आहे.
कोरोना संसर्गामुळे या आजाराची तसेच भविष्याची अनिश्चितता निर्माण झाली आहे. या संकटाने आर्थिक संकटदेखील आणले असून यामुळे प्रत्येकावर ताण पडत आहे. यातूनच चिंता, नैराश्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हे टाळण्यासाठी नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा दूरचित्रवाणीवरदेखील सकारात्मक घडामोडी पहात रहा. नियमित व्यायाम करा, एकमेकांना आधार द्या.
- डॉ. प्रदीप जोशी, मानसोपचार तज्ज्ञ.