रात्री १० नंतर शहरात चोख संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:18 AM2021-02-25T04:18:38+5:302021-02-25T04:18:38+5:30
जळगाव : शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी लागू केली ...
जळगाव : शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्यानुसार या संचारबंदीची शहरात चोख अंमलबजावणी होत आहे. टॉवर चौक, आकाशवाणी चौक यासह शहरातील इतर भागात पोलिसांचे वाहन गस्त घालून रात्री दहानंतर बाहेर फिरणाऱ्यांची चौकशी करतांना दिसून आले.
गेल्या आठवडाभरापासून शहरात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून, खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने कठोर उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे. यासाठी ६ मार्चपर्यंत जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालय, चित्रपटगृहे, जलतरण तलाव, संमेलन बंद ठेवण्याचे आदेश दिले असून, लग्न समारंभांना ५० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. तर नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर रात्रीची संचारबंदीही लागू केली असून, पोलिसांना रात्री दहानंतर विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाईच्या सूचनाही दिल्या आहेत. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या संचारबंदीची `लोकमत` प्रतिनिधीने मंगळवारी रात्री १०. ३० ते १२ च्या दरम्यान पाहणी केली असता, रेल्वे स्टेशन व नवीन बस स्टॅण्डजवळ येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वगळता सर्व रस्ते व चौकांचौकांमध्ये ९० टक्के शुकशुकाट दिसून आला. तसेच अनेक ठिकाणी वाहनधारकांना थांबवून चौकशी करण्यात येत होती. मात्र, कामावरून घरी जात असल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे, या वाहनधारकांना सोडण्यात येत होते.
रेल्वे स्टेशन परिसर
या ठिकाणी नेहमीप्रमाणे प्रवाशांची वर्दळ दिसून आली. प्रवाशांची वाट पाहत एका रांगेत १५ ते २० रिक्षा उभ्या होत्या. परिसरातील सर्व दुकाने बंद होती. खबरदारी म्हणून रेल्वे पोलीस स्टेशन परिसरात गस्त घालत होते. तर स्टेशनबाहेरील शहर पोलिसांची चौकी मात्र बंद दिसून आली. प्रवासी व रिक्षाचालकांव्यक्तीरिक्त या ठिकाणी पूर्णत: शुकशुकाट दिसून आला.
टॉवर चौक
टॉवर चौकात मधोमध चार पोलीस हातात दंडुका घेऊन उभे होते. टॉवर चौकाकडे जाणाऱ्या-येणाऱ्या पायी नागरिकांची व वाहनधारकांची चौकशी करीत होते व खात्री पटल्यानंतरच पुढे सोडत होते. यावेळी विनाकारण दुचाकीवर फिरणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना पोलिसांनी चांगलेच फटकारून वापस घराकडे पाठविले. तर विनाकारण फिरणारे वाहनधारक पोलिसांना पाहून माघारी फिरतांना दिसून आले. रात्री उशिरापर्यंत पोलीस या ठिकाणी थांबून होते.
आकाशवाणी चौक
शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या या चौकात उभारण्यात आलेल्या कट्ट्यावर रात्री उशिरापर्यंत नागरिक गप्पा मारत असतात. तसेच रस्त्यावरही फिरणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मात्र, कोरोनामुळे सध्या शहरात संचारबंदी लागू करण्यात आल्याने, मंगळवारी रात्री दहानंतर कट्ट्यावर बसलेले नागरिक घराकडे परततांना दिसून आले. त्यामुळे काही वेळातच या परिसरात शुकशुकाट निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांचे वाहन या चौकात काही थांबून गस्त घालतांना दिसून आले.
अजिंठा चौफुली
नेहमी वर्दळ असलेल्या या चौकातही रात्री दहानंतर कडक संचारबंदी लागू झालेली दिसून आली. प्रवाशांची वाट पाहत नेहमी प्रमाणे काही रिक्षा चौकात थांबलेल्या दिसून आल्या. यावेळी पोलिसांचे वाहन आकाशवाणी कडून एमआयडीसीकडे जातांना दिसून आले. मात्र, चौकात मात्र एकही वाहतूक पोलीस कार्यरत नव्हते. तसेच शहरातील नवीन बस स्टॅण्ड, भजे गल्ली, काव्यरत्नावली चौक, चित्रा चौक, मू. जे. महाविद्यालय परिसर या ठिकाणींही रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.