भुसावळच्या समतानगर आणि सिंधी कॉलनी परिसरात कडक संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 09:45 PM2020-04-27T21:45:31+5:302020-04-27T21:45:45+5:30
दोन झोन मध्ये संचारबंदी
भुसावळ : शहरात कोरोना बाधित दोन रुग्ण आढळले आहे. यामुळे जिल्हाधिकारी यांनी येथे भेट देत रुग्ण आढळलेल्या दोन्ही भागात कडक संचारबंदी लागलू केली आहे. तसेच समतानगर व सिंधी कॉलनी हा परिसर १४ दिवस सील केला आहे. दरम्यान पूर्ण शहरच चार ते पाच दिवसांसाठी सील करण्यात यावे असे मत आमदार संजय सावकारे यांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे व जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्याकडे मांडले आहे. यावर एकूण स्थिती पाहिल्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे व जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. उगले हे सोमवार रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरात पहाणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी जामनेर रोड वरील अष्टभुजा देवी मंदीराजवळ थांबून त्यांनी आमदार संजय सावकारे यांच्याशी चर्चा केली.
शहर सील करायचे असेल तर १४ दिवसांचा कालावधी योग्य असतो. त्यामुळे ज्या परिसरात रुग्ण आढळले आहे. तो परिसर सील करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. जो परिसरा सील करण्यात आला आहे. त्या परिसरात जीवनावश्यक वस्तू पोहचविण्याची जबाबदारी न.पा. कडे देण्यात आल्याचे सांगत त्यानी त्यांनी समता नगर व सिंधी कॉलनी परिसराची पहाणी केली.
दोन झोन मध्ये संचारबंदी
भुसावळात कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्याधिकारी ढाकणे यांच्या उपस्थितीत येथील शासकीय विश्राम गृहात तातडीची बैठक घेण्यात आली. शहरात कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी काय उपाय योजना करता येईल यावर चर्चा करण्यात आली. त्यादृष्टीने समतानगर व सिंधी कॉलनी या दोन झोनमध्ये अत्यंत कडक संचारबंदी लागू केली आहे. बैठकीला पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, प्रांत अधिकारी रामसिंग सुलाने, डिवायएसपी गजानन राठोड, तहसीलदार दिपक धिवरे, मुख्याधिकारी करुना डहाळे, पो. नि. दिलीप भागवत, पो. नि. रामकृष्ण कुंभार, पो.नि. बाबासाहेब ठोंबे, मंडळ अधिकारी योगिता पाटील, तलाठी रतनाणी उपस्थित होते.
नऊ जण हॉस्पिटल क्वारंटाइन
भुसावळ शहरातील सिंधी कॉलनी परिसरात संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नऊ जणांना जळगाव येथे हॉस्पिटल क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच या रुग्णाच्या नातेवाईकांना तपासणीसाठी जळगाव येथे दाखल करण्यात आले आहे.